केएससीए थर्ड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए थर्ड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून चॅलेंजर्स युथ स्पोर्ट्स क्लब अ संघाने अर्जुन स्पोर्ट्स क्लब संघाचा 88 धावांनी तर हिंडाल्को स्पोर्ट्स क्लब अ संघाने बेळगाव स्पोर्ट्स क्लब सी संघाचा 7 गडय़ांनी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. मोहन नाथबुवा व विनायक कांबळे यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
बेळगावच्या केएससीए मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात चॅलेंजर्स युथ स्पोर्ट्स क्लब अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 29 षटकात 4 गडी बाद 273 धावा जमविल्या. त्यात सलामीवीर विनायक कांबळेने 6 षटकार 10 चौकारांसह शंभर धावा करून स्पर्धेतील पहिले शतक झळकविले. त्याला शुभम नागेशने 3 षटकार 8 चौकारांसह 73, ओम मातीवड्डरने 51 तर प्रथमेश लोहारने 22 धावा करून सुरेख साथ दिली. अर्जुन स्पोर्ट्सतर्फे महेश कदमने 2 तर सिद्धार्थ गोदवानीने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना अर्जुन स्पोर्ट्सने 29 षटकात 8 गडी बाद 185 धावा केल्या. त्यात महेश कदमने 2 षटकार 6 चौकारांसह 96 तर पार्थ नयनीने 25 धावा केल्या. चॅलेंजर्सतर्फे अनिकेत लोहार, प्रज्ज्वल जाधव, विनायक कांबळे यांनी प्रत्येकी 2 तर वेंकटेश वड्डर, प्रथमेश लोहार यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब सी संघाने प्रथम फलंदाजी करताना 22.4 षटकात सर्वगडी बाद 100 धावा केल्या. त्यात प्रतीक खराडेने 21, सोमनाथ सोमणाचेने 28 धावा केल्या. हिंडाल्कोतर्फे मोहन नाथबुवाने 15 धावात 4, सुनील गुरवने 15 धावात 3 तर विशाल, सुनील व संतोष यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना हिंडाल्को स्पोर्ट्स क्लबने 18.1 षटकात 3 गडी बाद 101 धावा करून सामना 7 गडय़ांनी जिंकला. त्यात सुनील पाटीलने नाबाद 55, सुनील गुरवने नाबाद 21 तर राजू मानेने 18 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे प्रवीण खराडेने 2 तर अभिषेक निकमने 1 गडी बाद केला.