प्रतिनिधी /बेळगाव
शहर व उपनगरातील डेनेज व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आली असून विविध ठिकाणी सातत्याने तक्रारी होत असतात. विशेषतः आनंदनगर परिसरात डेनेजवाहिन्यांची समस्या कायम भेडसावत असते. अशातच दुसरा क्रॉस येथील डेनेज चेंबरवरील झाकण खराब झाल्याने वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे.
या परिसरात नेहमीच विविध समस्या निर्माण होत असून समस्यांचे निवारण करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. परिसरातील काही रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तसेच डेनेजवाहिन्यांची समस्यादेखील डोकेदुखीची बनली आहे. दुसरा क्रॉस येथील डेनेज चेंबरवरील झाकण खराब झाले असून कोसळण्याचा धोका आहे. या ठिकाणी वाहने अडकून पडत असून वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. डेनेज चेंबरवरील झाकण घालण्यासाठी मनपाकडे तक्रार केली होती. पण याची दखल घेतली नाही. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. येथील चेंबरवरील झाकण तातडीने घालावे, अशी मागणी होत आहे.