जोरदार मोर्चेबांधणी : नव्याने सहभागासाठीची तयारी सुरू : न्यूज लेटर उशिरा आल्याने इच्छुकांतून नाराजी
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीजच्या 2020-21 करिता नूतन कार्यकारिणीसाठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 17 नोव्हेंबरपासून या प्रक्रियेला सुरुवात झाली असून सोमवार दि. 30 नोव्हेंबर रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. एकूण 10 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यामुळे निवडणुकीसाठी व्यापारी व उद्योजकांमधून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
दि. 17 ते 19 नोव्हेंबरदरम्यान न्यू गुड्सशेड रोड येथील नर्तकी स्क्वेअर किंवा उद्यमबाग येथील खानापूर रोड येथील कार्यालयात अर्ज उपलब्ध असणार आहेत. रविवार दि. 22 रोजी सायंकाळी 6 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. दि. 24 पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. दि. 30 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार असून दुपारी 4.30 नंतर मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे.
उद्योजक-व्यापाऱयांमधून नाराजी
निवडणूक प्रक्रियेपूर्वी किमान 8 ते 10 दिवस आधी सर्व सदस्यांना न्यूज लेटर पाठवावे लागते. परंतु निवडणूक अर्ज उपलब्ध करून देण्याच्या दिवशीच न्यूज लेटर सदस्यांना देण्यात आले. यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी कसे होणार, असा प्रश्न उद्योजक व्यापाऱयांसमोर आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. रविवारपेठमधील अनेक सदस्यांना या निवडणुकीमध्ये सहभागी व्हायचे असल्याने त्यांच्याकडून जोरदार तयारी केली जात आहे. युवा उद्योजक व व्यापारी अधिकाधिक अर्ज दाखल करण्यासाठी तयारी करीत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
चेंबर ऑफ कॉमर्स ही उद्योजक व व्यापाऱयांचे प्रतिनिधीत्व करणारी संस्था आहे. व्यापार, उद्योग, कर व इतर क्षेत्रातील समस्यांवर आवाज उठविणे, जागृतीपर कार्यक्रम घेणे, तसेच संघटना बळकट करणे ही या संस्थेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
स्थानिक व्यापारी व उद्योजकांतील धडाडीचे तरुण प्रतिनिधी या संस्थेत आल्यास विविध समस्यांना न्याय मिळू शकेल, यासाठी निवडणूक प्रक्रियेत जास्तीत जास्त जणांनी सहभागी होण्याची मानसिकता तयार होत आहे.