पोलिसांसह बंदोबस्तवरील शिक्षक बचावले, कराडलगतची घटना
प्रतिनिधी/ कराड
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील वाहन तपासणीसाठी मालखेड (ता. कराड) येथे रस्त्यावर चेकपोस्ट उभा केला आहे. सोमवारी सकाळी कोल्हापूरकडून पुण्याकडे निघालेला भरधाव ट्रक अचानक चेकपोस्टमध्ये घुसला. चेकपोस्टचा तंबू तोडून ट्रक आत घुसल्याने अपघात झाला. अपघातात तपासणीसाठी उभे असलेले शिक्षक गंभीर जखमी झाले. इतर तीन पोलिसांसह चौघे प्रसंगावधान राखून पळाल्याने ते बचावले. घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलिसात झाली आहे.
आत्माराम ज्ञानदेव मिसाळ (रा.वाठार ता. कराड) असे जखमी शिक्षकाचे नाव असून त्यांच्या दुचाकीलाही ट्रकची धडक बसली. त्यामुळे दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाने जिह्याच्या सीमेवर चेकपोस्ट उभा केले आहेत. कराड तालुक्यातील मालखेड येथेही चेकपेस्ट उभा केले आहे. चेकपोस्टच्या बाजूलाच आरोग्य विभागाचाही तंबू आहे.
या चेकपोस्टवर कराड ग्रामीण पोलीस, शिक्षक, होमगार्ड वाहन तपासणी दिवसरात्र असतात. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे वाहन तपासणी सुरू होती. साडेनऊच्या सुमारास कोल्हापूर बाजूकडून एक भरधाव मालट्रक कराडच्या दिशेने येत होता. मालखेड येथे आल्यावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यामुळे भरधाव ट्रक थेट चेकपोस्टच्या तंबुत घुसला. भरधाव ट्रकचा मोठा आवाज आल्याने बंदोबस्तासाठी उभे असलेले पोलीस, शिक्षक, होमगार्ड तंबूतून बाहेर पळाले. ट्रकचा वेग इतका भरधाव होता की तंबूचा मंडप तोडून ट्रकने तेथील दुचाकींनाही धडक दिली. या अपघातात आत्माराम ज्ञानदेव मिसाळ हे शिक्षक जखमी झाले. मिसाळ हे वाठार येथे सेवा बजावतात. त्यांच्यासमवेत जीवन प्रकाश जोशी हे शिक्षकही होते. अपघातात चेकपोस्टचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने इतर सर्वजण पळाल्याने ते बचावले. जखमी शिक्षकास उपचारासाठी खासगी रूग्णालयात नेण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, जमीला मुलाणी, केंद्रप्रमुख खाशाबा धामवडकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून चेकपोस्टची जागा बदलण्याची सुचना केली. या अपघाताने चांगलीच खळबळ उडाली होती. ट्रकचालकावर कराड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.