सिडनी / वृत्तसंस्था
मार्चपासून व्यावसायिक क्रिकेटपासून दूर असलेला मध्यफळीतील अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने गुरुवारी कसून सरावाला सुरुवात केली. शिवाय, जलद गोलंदाजांना तो अगदी आत्मविश्वासाने सामोरे गेला. बीसीसीआयने पुजाराच्या नेट सेशनचा छोटासा व्हीडिओ सोशल मीडियावर देखील पोस्ट केला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुढील महिन्यात खेळवल्या जाणाऱया कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर, त्याने सरावाचा श्रीगणेशा केला. पुजाराने साईड नेटस्च्या दोन्ही बाजूंनी फलंदाजी केली. शिवाय, मुख्य खेळपट्टीवर इशान पोरेल, कार्तिक त्यागीसह उमेश यादव व रविचंद्रन अश्विन यांचा मुकाबला केला. यापैकी इशान पोरेल व कार्तिक त्यागी हे नेट बॉलर या नात्याने संघासमवेत आहेत.
भारतीय संघ सध्या 14 दिवस क्वारन्टाईनमध्ये आहे. मात्र, या कालावधीत त्यांना सरावाची मुभा आहे. उभय संघातील वनडे व टी-20 मालिकेला दि. 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. त्यानंतर 4 सामन्यांची कसोटी मालिका दि. 17 डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये खेळवली जाणार आहे. ं
बहुतांशी भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होते तर कसोटी संघातील नियमित खेळाडू पुजारा व हनुमा विहारी हे ऑस्ट्रेलियात दाखल होण्यापूर्वी संयुक्त अरब अमिरातीत राष्ट्रीय संघाच्या जैवसुरक्षित वातावरणात सामील झाले होते. पुजारा यापूर्वी रणजी फायनलमध्ये खेळला असून दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला ऐतिहासिक मालिकाविजय मिळवून देण्यात त्याने सिंहाचा वाटा उचलला होता. यंदाच्या मालिकेत विराट कोहली ऍडलेड ओव्हलवरील पहिला कसोटी सामना आटोपून मायदेशी परतल्यानंतर पुजाराची जबाबदारी आणखी वाढणार आहे. कोहली आपल्या पहिल्या अपत्याच्या प्रतीक्षेत असून यासाठी तो पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतत आहे.
थ्रो-डाऊन स्पेशालिस्ट रघू दाखल
भारताचा थ्रो-डाऊन स्पेशालिस्ट रघू हा गुरुवारी सिडनीत दाखल झाला असून संघात दाखल होण्यापूर्वी तो 14 दिवसांसाठी क्वारन्टाईन असेल. यापूर्वी कोरोनाबाधित असल्याने तो भारतीय साहायक पथकातील सदस्यांसमवेत ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकला नव्हता.