पंजाबचे आव्हान संपुष्टात, धोनीसेनेची औपचारिक सामन्यात एकतर्फी बाजी, ऋतुराज गायकवाडचे सलग तिसरे अर्धशतक
वृत्तसंस्था/ अबु धाबी
काहीही गमावण्यासारखे नसते, प्रतिष्ठा पणाला लागलेली नसते, त्यावेळी कोणतेही दडपण असत नाही. निश्ंिचतपणाने खेळ साकारता येतो. यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर फेकल्या गेलेल्या चेन्नई सुपरकिंग्सने किंग्स इलेव्हन पंजाबला आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात 9 गडी राखून पराभूत केले, त्यावेळी जणू याचीच प्रचिती आली. या आयपीएल हंगामातील आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात चेन्नईने दडपणाखाली असलेल्या पंजाबविरुद्ध पूर्ण झोकून खेळ साकारला आणि चक्क 9 गडी राखून एकतर्फी विजय संपादन केला. या निकालामुळे पंजाबचे आव्हानही संपुष्टात आले.
प्रारंभी, पंजाबने 20 षटकात 6 बाद 153 धावा केल्या तर प्रत्युत्तरात चेन्नई सुपरकिंग्सने 18.5 षटकातच एका गडय़ाच्या बदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले. ऋतुराज गायकवाडचे सलग तिसरे अर्धशतक चेन्नईच्या डावाचे वैशिष्टय़ ठरले. त्याने 49 चेंडूत 6 चौकार, 1 षटकारासह नाबाद 62 धावा फटकावल्या.
वास्तविक, पंजाबला स्पर्धेतील अस्तित्व कायम राखण्यासाठी हा सामना कोणत्याही स्थितीत जिंकणे आवश्यक होते. पण, चेन्नईने त्यांचे मनसुबे पार धुळीस मिळवले. प्रारंभी दीपक हुडाच्या 30 चेंडूतील 62 धावांच्या खेळीमुळे पंजाबने 6 बाद 153 धावा जमवल्या. पण, चेन्नईने प्लेसिस (48) व गायकवाड यांच्या धुवांधार फलंदाजीमुळे विजयाचे लक्ष्य सहज सर केले. प्लेसिसने 4 चौकार व 2 षटकार खेचले. शिवाय, गायकवाडसमवेत पहिल्या 10 षटकातच 82 धावांची तडाखेबंद सलामी नोंदवली.
गायकवाड 49 चेंडूत 62 धावांवर नाबाद राहिला. त्याच्या खेळीत 6 चौकार व एका षटकाराचा समावेश राहिला. अम्बाती रायुडूने एका चेंडूमागे एक धाव या समीकरणाने 30 धावांचे योगदान दिले.
तत्पूर्वी, हुडाने 4 षटकार व 3 चौकार फटकावल्यानंतर पंजाबला 153 धावांपर्यंत मजल मारता आली. हुडाच्या फटकेबाजीमुळेच पंजाबला शेवटच्या 3 षटकात 40 धावांची आतषबाजी करता आली.
एकीकडे, अन्य सहकारी फलंदाज उत्तम सुरुवात करुनही त्याचे मोठय़ा खेळीत रुपांतर करण्यात अपयशी ठरत असताना दुसरीकडे, हुडाने मात्र दमदार फलंदाजी साकारली. जलद गोलंदाज एन्गिडीने चेन्नईतर्फे 3 बळी घेतले. मायंकने दीपक चहरच्या पहिल्याच षटकात दोन चौकार फटकावत उत्तम सुरुवात केली होती.
धावफलक
किंग्स इलेव्हन पंजाब : केएल राहुल त्रि. गो. एन्गिडी 29 (27 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), मायंक त्रि. गो. एन्गिडी 26 (15 चेंडूत 5 चौकार), ख्रिस गेल पायचीत गो. इम्रान ताहीर 12 (19 चेंडू), निकोलस पूरन झे. धोनी, गो. ठाकुर 2 (6 चेंडू), मनदीप सिंग त्रि. गो. जडेजा 14 (15 चेंडूत 1 चौकार), दीपक हुडा नाबाद 62 (30 चेंडूत 3 चौकार, 4 षटकार), नीशम झे. गायकवाड, गो. एन्गिडी 2 (3 चेंडू), जॉर्डन नाबाद 4 (5 चेंडू). अवांतर 2. एकूण 20 षटकात 6 बाद 153.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-48 (मायंक, 5.2), 2-62 (केएल राहुल, 8.3), 3-68 (पूरन, 10.4), 4-72 (ख्रिस गेल, 11.5), 5-108 (मनदीप, 16.2), 6-113 (नीशम, 17.1).
गोलंदाजी : दीपक चहर 3-0-30-0, सॅम करण 2-0-15-0, शार्दुल ठाकुर 4-0-27-1, एन्गिडी 4-0-39-3, इम्रान ताहीर 4-0-24-1, रविंद्र जडेजा 3-0-17-1.
चेन्नई सुपरकिंग्स : ऋतुराज गायकवाड नाबाद 62 (49 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), प्लेसिस झे. राहुल, गो. जॉर्डन 48 (34 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), अम्बाती रायुडू नाबाद 30 (30 चेंडूत 2 चौकार). अवांतर 14. एकूण 18.5 षटकात 1 बाद 154.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-82 (प्लेसिस, 9.5).
गोलंदाजी : नीशम 3-0-26-0, शमी 4-0-29-0, जॉर्डन 3-031-1, रवी बिश्नोई 4-0-39-0, मुरुगन अश्विन 4-0-17-0, ख्रिस गेल 0.5-0-5-0.