गायकवाड, कॉनवेची अर्धशतके, मुकेश चौधरीचे 4 बळी
सुकृत मोकाशी / पुणे
सामनावीर ऋतुराज गायकवाड व कॉनवे यांची शानदार अर्धशतके आणि मुकेश चौधरीची भेदक गोलंदाजी यांच्या बळावर चेन्नई सुपरकिंग्सने आयपीएलमधील सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा 13 धावांनी पराभव करीत या मोसमातील तिसरा विजय नोंदवला.
चेन्नईने उभ्या केलेल्या मोठय़ा आव्हानाचा पाठलाग करताना विल्यम्सन आणि अभिषेक शर्मा या सलामवीरांनी आक्रमक अर्धशतकी सलामी दिली. हैदराबादची धावसंख्या 58 असताना शर्माला 39 धावांवर चौधरीने प्रिटोरियसकरवी झेलबाद केले. यापाठोपाठ त्रिपाठीही शून्य धावांवर बाद झाल्यानंतर हैदराबादची बिनबाद 58 धावांवरून 2 बाद 58 अशी स्थिती झाली. पॉवरप्लेच्या पहिल्या सहा षटकात हैदराबादने 2 बाद 58 धावा केल्या.
यानतंर आलेल्या मार्करम आणि विल्यम्सन हे डाव सावरतील असे वाटत असनाताच मार्करम सॅटनरचा शिकार ठरला. त्याला 17 धावा करता आल्या. यावेळी हैदराबादची धावसंख्या 88 होती. यानंतर 126 धावसंख्या असताना चेन्नईला विल्यम्सनची मोठी विकेट मिळाली. त्याला प्रिटोरियसने पायचित टिपले. त्याने 47 धावा केल्या. हैदराबादची धावसंख्या 151 असताना शशांकसिंग 15 धावा काढून बाद झाला. त्याला धोनीकरवी चौधरीने झेलबाद केले. पाठोपाठ दुखापतग्रस्त सुंदरही बाद झाला. एकाच षटकात चौधरीने दोघांना बाद झाला.
दरम्यान, पूरनने आपले अर्धशतक पूर्ण केले. पूरनने एक बाजू लावून धरली. पण, दुसऱया बाजूने त्याला म्हणावी तशी कोणाची साथ लाभली नाही. हैदाराबादला 20 षटकात सहा बाद 189 धावांवर रोखत चेन्नईने 13 धावांनी विजय मिळविला. चेन्नईकडून चौधरीने चार बळी घेतले. तर, सॅन्टनर आणि प्रिटोरियसने प्रत्येकी एक बळी घेतले.
चेन्नईचे खराब क्षेत्ररक्षण
चेन्नईने अभिषेक शर्मा, निकोलस पूरन यांचे झेल सोडले. याआधी पॉवप्लेच्या षटकातही शर्माचा झेल समरजितसिंगच्या गोलंदाजीवर चौधरीने सोडला. प्रिटोरियसने टाकलेल्या 19 व्या षटकात पूरनचे दोन झेल सोडले. आजपर्यंतच्या मॅचपर्यंत चेन्नईने 19 झेल सोडले आहेत.
चेन्नईच्या सलामीवीरांनी संयमी सुरुवात करून पॉवरप्लेच्या पहिल्या सहा षटकात बिनबाद 40 धावा काढल्या. यावेळी ऋतुराज बरोबर उथप्पा न येता डेवॉन कॉनवे आला होता. आपल्या वेगाने सगळ्या फलंदाजांची भंबेरी उडविणाऱया उमरान मलिकने टाकलेल्या त्याच्या पहिल्याच षटकात एक चौकार, एक षटकारासह 13 धावा वसूल केल्या. दरम्यान, ऋतुराजने या सिझनमधील आपले अर्धशतक पूर्ण केले. चेन्नईने पहिल्या दहा षटकात साडेआठच्या ऍव्हरेजने बिनबाद 85 धावा केल्या. अकराव्या षटकारादरम्यान, गायकवाड आणि कॉनवेने शतकी भागीदारी पूर्ण केली.
यादरम्यान, कॉनवेनेही आपले अध्&शतक पूर्ण केले. गायकवाड आणि कॉनवेने हैदराबादच्या गोलंदाजीला दाद न लागू देता त्यांची यथेच्छ पिटाई केली. गायकवाड आणि कॉनवेने 17.5 षटकात 182 धावांची भागीदारी केली. चेन्नईच्या 182 धावा झाल्या असताना गायकवाड 99 धावांवार बाद झाला. अवघ्या एका धावेने त्याचे शतक हुकले. सहा चौकार आणि सहा षटकारांनी त्याने आपली खेळी सजविली. त्याला नटराजनने भुवनेश्वरकरवी झेलबाद केले. यानंतर मैदानात धोनी उतरताच प्रेक्षकांचा जल्लोष सुरु झाला. पण, चेन्नईची धावसंख्या 192 असताना धोनी अवघ्या आठ धावा काढून बाद झाला. त्यालाही नटराजनने उमरान मलिककरवी झेलबाद केले. यानंतर जडेजा आणि कॉनवेने चेन्नईला दोनशे धावांचा टप्पा पार करुन दिला. चेन्नईने वीस षटकात 2 बाद 202 धावांपर्यंत मजल मारली. कॉनवे 85 धावांवर नाबाद राहिला. त्याने आठ चौकार आणि चार षटकारांची आतषबाजी केली. तर, जडेजा एका धावेवर नाबाद राहिला. हैदराबादकडून नटराजनने दोन बळी टिपले.
पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना रंगला. हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईचे कर्णधारपद जडेजाने धोनीकडे दिल्याने या सिझनमध्ये धोनी पहिल्यांदाच नाणेफेकीला आला.
संक्षिप्त धावफलक ः चेन्नई सुपरकिंग्स 20 षटकांत 2 बाद 202 ः ऋतुराज गायकवाड 99 (57 चेंडूत 6 चौकार, 6 षटकार), कॉनवे नाबाद 85 (55 चेंडूत 8 चौकार, 4 षटकार), धोनी 8 (7 चेंडूत 1 चौकार), जडेजा नाबाद 1, अवांतर 9. गोलंदाजी ः टी. नटराजन 2-42, जान्सन 0-38, उमरान मलिक 0-48, भुवनेश्वर 0-22).
सनरायजर्स हैदराबाद 20 षटकांत 6 बाद 189 ः अभिषेक शर्मा 24 चेंडूत 39, विल्यम्सन 37 चेंडूत 47, मार्करम 10 चेंडूत 17, पूरन नाबाद 64 (33 चेंडूत 3 चौकार, 6 षटकार), शशांक सिंग 15, अवांतर 5. गोलंदाजी ः मुकेश चौधरी 4-46, सँटनर 1-36, प्रेटोरियस 1-40.