चेन्नई / वृत्तसंस्था
चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपण आपली शेवटची टी-20 लढत चेन्नईमध्येच खेळणार असल्याचे ठासून सांगितले. मात्र, याचवेळी ही शेवटची लढत पुढील वर्षी असेल की आणखी पाच वर्षांनी, याबद्दल त्याने सस्पेन्स कायम ठेवला. धोनीने मागील महिन्यात युएईमध्ये संपन्न झालेल्या स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्स संघाला चौथ्यांदा आयपीएल जेतेपद मिळवून दिले. या जेतेपदाचे सिलेब्रेशन शनिवारी चेन्नईत केले गेले. त्याप्रसंगी धोनी बोलत होता.
धोनीने अद्याप आपण किमान एक हंगाम खेळणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यामुळे, पुढील आयपीएलमधील त्याचा सहभाग निश्चित मानला जातो.
‘मी भविष्यातील रणनीती निश्चित केली आहे. शेवटचा सामना मी रांचीमध्ये खेळला. मायदेशातील शेवटचा वनडे सामना रांचीत झाला. आता टी-20 मध्ये शेवटची लढत चेन्नईमध्येच खेळण्याचा माझा मानस आहे’, असे धोनीने येथे पुढे नमूद केले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, इंडिया सिमेंट्सचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एन. श्रीनिवासन, महान अष्टपैलू कपिलदेव, बीसीसीआय सचिव जय शाह, आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेल याप्रसंगी उपस्थित होते.
‘चेन्नई सुपरकिंग्सचे अवघ्या जगभरात चाहते आहेत. सामना बेंगळूरमध्ये असेल, जोहान्सबर्गमध्ये किंवा दुबईत, आम्हाला चाहत्यांचे नेहमीच पाठबळ लाभते. मध्यंतरीच्या दोन वर्षात आम्ही आयपीएल खेळू शकलो नव्हतो, त्यावेळी देखील सोशल मीडियावर आमचा संघच अधिक चर्चेत होता’, याचा धोनीने उल्लेख केला.
श्रीनिवासन यांनी यावेळी धोनीच्या नेतृत्वगुणाची विशेष प्रशंसा केली. ‘धोनी कुठेही गेलेला नाही. तो आमच्यासोबतच आहे’, असे ते येथे म्हणाले. 2020 आयपीएल आवृत्ती युएईमध्ये झाल्याने तर यंदा पहिल्या टप्प्यातील सामने मुंबईत झाल्याने धोनीला 2019 नंतर चेन्नईत आयपीएलची एकही सामना खेळता आलेला नाही. या पार्श्वभूमीवर, चेन्नईचे चाहते देखील घरच्या भूमीतील लढतीच्या प्रतीक्षेत आहेत.
चेन्नई सुपरकिंग्स ‘त्या’ तीन खेळाडूंना रिटेन करण्याची शक्यता!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईचा संघ पुढील आयपीएल हंगामाकरिता कर्णधार धोनी, अष्टपैलू रविंद्र जडेजा व धडाकेबाज सलामीवीर ऋतुराज गायकवाड यांना संघात कायम ठेवण्याची शक्यता आहे. 40 वर्षीय धोनीने गतवर्षी ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून सध्या तो फक्त आयपीएलमध्ये खेळत आला आहे.