प्राणिसंग्रहालयातील 11 पैकी 9 सिंह संक्रमित
वृत्तसंस्था/ चेन्नई
कोरोना विषाणुमुळे माणसांनंतर आता प्राण्यांचाही मृत्यू होऊ लागला आहे. चेन्नईला लागून असलेल्या वंडालूर येथील अरिग्नार अण्णा जूलॉजिकल पार्कमध्ये संक्रमणामुळे 9 वर्षीय सिंहिण नीलाचा मृत्यू झाला आहे. नीला सिंहिणीत कोरोनाची कुठलीच लक्षणे दिसून आली नव्हती. केवळ एक दिवसापूर्वी तिच्या नाकातून काही स्राव होताना दिसून आला होता.
प्राणिसंग्रहालयातील 11 पैकी 9 सिंह कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यांच्या स्वॅबची तपासणी भोपाळमध्ये करण्यात आली होती. पण त्यांच्या अहवाला पुष्टी मिळावी म्हणून त्यांचे नमुने भारतीय पशूचिकित्सा संशोधन संस्था (बरेली) आणि सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (हैदराबाद) येथे पाठविण्यात आले आहेत. सध्या सर्व सिंहांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. सिंह आणि वाघांमध्ये कोरोना संक्रमण पहिल्यांदा बार्सिलोना (स्पेन) आणि अमेरिकेच्या ब्रोंक्स प्राणिसंग्रहालयांमध्ये आढळले होते.
भूक न लागणे, खोकल्याची लक्षणे
संक्रमणाची लक्षणे 26 मे रोजी दिसून आली होती. सफारी पार्क क्षेत्रातील ऍनिमल हाउस 1 मध्ये ठेवण्यात आलेल्या सिंहांमध्ये एनोरेक्सिया (भूक न लागणे) आणि खोकल्याची लक्षणे आढळली होती. सिंहांच्या रक्ताचे नमुने तामिळनाडूतील वेटनरी अँड ऍनिमल सायन्स युनिव्हर्सिटीला पाठविण्यात आल्याचे प्राणिसंग्रहालयाकडून सांगण्यात आले. तर नाकातील स्वॅब, रेक्टल स्वॅब आणि 11 सिंहांचे मलाचे नमुने राष्ट्रीय उच्चसुरक्षा रोग संस्था, भोपाळमध्ये पाठविण्यात आले आहे. प्राणिसंग्रहालयातील सर्व कर्मचाऱयांना लस देण्यात आली आहे.
हैदराबादमध्ये पहिल्यांदा संक्रमण सिंहांमध्ये कोरोना संक्रमणाचे पहिले प्रकरण हैदराबादमध्ये मिळाले होते. येथे 8 सिंहांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. प्राण्यांमध्ये कोरोना संक्रमण आढळून येणारे हे देशातील पहिले प्रकरण होते. त्याच्या काही दिवसांनी उत्तरप्रदेशच्या इटावा येथील प्राणिसंग्रहालयात एक सिंह संक्रमित आढळला होता.