क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
वास्कोतील टिळक मैदानावर आज रविवारी आयएसएल फुटबॉल स्पर्धेत हैदराबाद एफसी आणि चेन्नईन एफसी संघात लढत होईल. बाद फेरीतील प्रवेशासाठी ही लढत दोन्ही संघांसाठी महत्वाची असेल. सध्या हैदराबाद एफसीचे 14 सामन्यांतून 19 गुण झाले असून ते चौथ्या स्थानावर आहेत. चेन्नईन एफसीचे 14 सामन्यांतून 16 गुण आहेत.
आजच्या सामन्यात हैदराबाद एफसी जिंकल्यास ते एफसी गोवा संघाला मागे टाकू शकतील आणि एटीके मोहन बागानच्या जवळपास जातील. सध्याचा फॉर्म पाहिल्यास हैदराबाद एफसीचे पारडे जड आहे. त्यांचा खेळ अप्रतिम होत नसला तरी गेल्या सहा सामन्यांत ते अपराजित आहेत. यानंतरही त्यांचे प्रशिक्षक चिंतेत असतील. कारण त्यांचे सहा पैकी चार सामने बरोबरीत सुटले आहेत.
आरिदाने सँटानाला गवसलेला फॉर्म हैदराबाद एफसीसमोरील समस्या सोडविण्याच्यादृष्टिने उपयुक्त ठरेल. मागील सामन्यात या स्ट्रायकरने बेंगलोर एफसीविरूद्ध पुनरागमन करण्यात बहुमोल वाटा उचलला होता. आरिदोन सँटाना हा हैदराबाद एफसीचा हुकमी स्ट्रायकर आहे.
चेन्नईन एफसीला पिछाडी कमी करण्यासाठी आधीच्या लढतीमधील खराब कामगिरीची भरपाई करण्याचीही संधी मिळाली आहे. आम्ही तीन गुणांनी ज्यांच्याविरूद्ध पिछाडीवर आहोत, केवळ त्यांच्याशीच हा सामना नाही. आधीच्या सामन्यात आम्ही हैदराबादविरूद्ध फारच खराब खेळ केला आणि आता आम्हाला ते चित्र बदलायचे आहे, असे चेन्नईन एफसीचे प्रशिक्षक क्साबा लॅसझ्लो म्हणाले.
प्रोफेशनल फुटबॉलमध्ये नेहमीच निकालाला महत्व असते. काही वेळा आमच्यासाठी दिवस खराब ठरतो, पण चिवट झुंज दिल्याशिवाय संघाने हार मानणे मला पसंत नाही. त्यांनी जिद्दीने, लढाऊ वृत्तीने खेळ करायला हवा, असे ते म्हणाले. प्रतिस्पर्धी प्रशिक्षकांप्रमाणेच लॅसझ्लो यांना सुद्धा आघाडीफळीकडून चांगल्या खेळाची अपेक्षा असेल. आतापर्यंतच्या मोसमात चेन्नईनला गोल करण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. त्यांच्या गोलांची अकरा ही संख्या स्पर्धेत सर्वांत कमी आहे. ही आकडेवारी सुधारली नाही तर चेन्नईनच्या बाद फेरीच्या आशांना बळ मिळणे आवश्यक आहे.