क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील दोन वेळचा जेता चेन्नईन एफसनी आपली आघाडीफळी भक्कम करण्याच्या यत्नात पोलंडच्या लुकास गिकीविक्झला करारबद्ध केले आहे. लुकास गिकीविक्झचा करार 2021-22 मोसमासाठी असेल. चेन्नईन एफसीने आतापर्यंत पाच विदेशी फुटबॉलपटूंना करारबद्ध केले आहे.
लुकास गिकीविक्झ आतापर्यंत 200 हून अधिक क्लबसामने खेळला असून त्याने 49 गोल केले असून गोल करण्यासाठी 21 असिस्ट केले आहे. लुकास संघात आल्याने निश्चितच आमची आघाडीफळी अधिक मजबून बनणार असल्याचे चेन्नईन एफसीच्या सहमालक विटा दाणी म्हणाल्या. लुकास हा कझाकस्तान, साऊदी अरेबिया, थायलंड आणि बहारीन या आशियाई देशातील संघांनाही खेळला असून 2017-18 फुटबॉल मोसमात तो जॉर्डनच्या प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत अल-फैसाली अम्मान क्लबला खेळताना सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला होता.
33 वर्षीय लुकास गिकीविक्झ हा युरोप लीग आणि चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतही खेळला आहे. 13 वर्षे प्रोफेशनल फुटबॉल स्पर्धा खेळणाऱया लुकासने पोलंडमधील ओलिंपिया, एल्बलाग या क्लबांना खेळला असून तो सायप्रस, बल्गेरिया आणि रुमानिया या देशातही खेळला आहे. प्रोफेशनल फुटबॉलचा जबरदस्त अनुभव असलेल्या लुकासच्या समावेशाने आमचा संघ अधिक बलवान बनला असल्याचे चेन्नईन एफसीचे प्रशिक्षक बोजिदार बांदोवीच म्हणाले.