ऑनलाईन टीम / चेन्नई :
तामिळनाडू सरकारकडून चेन्नई आणि आजूबाजूच्या भागात आणखी 12 दिवसांसाठी लॉक डाऊन वाढवण्यात आला आहे. या सोबतच राज्य सरकारने सांगितले की, पुुढेेेे येणाऱ्या दोन रविवारी राज्य पूर्ण बंद ठेवण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानिस्वामी यांनी सोमवारी सांगितले की, चेन्नई आणि आजूबाजूच्या भागात 19 ते 30 जून पर्यंत पुन्हा एकदा लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. तसेच आता देण्यात आलेल्या सवलती देखील कमी करण्यात येणार आहेत.
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांबरोबर झालेल्या बैठकीनंतर पलानिस्वामी यांनी सांगितले की, लॉक डाऊन चेन्नई आणि ग्रेटर चेन्नई पोलीस स्टेशनांच्या हद्दीत येणाऱ्या बहुतेक भागांमध्ये लागू केला जाईल. यामध्ये तिरुवल्लूर, चेंगलपट आणि कांचीपुरम जिल्हे येतात.
पुढे ते म्हणाले, 12 दिवस वाढवण्यात आलेल्या लॉक डाऊन मध्ये अत्यावश्यक सेवांना काही नियमांचे पालन करून परवानगी दिली जाईल. हे लॉक डाऊन 19 ते 30 जून असेल आणि यामध्ये येणाऱ्या दोन्ही रविवारी (21 व 28 जून) संपूर्ण राज्य पूर्ण पणे बंद असेल. त्यामध्ये कोणत्याही प्रकारे सूट दिली जाणार नाही, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.