वृत्तसंस्था/ दुबई
सातत्य राखण्यासाठी झगडणाऱया धोनीचा चेन्नई सुपरकिंग्स व कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर यांच्यात शनिवारी आयपीएलमधील लढत होणार असून चेन्नई संघात काही बदल होण्याची अपेक्षा केली जात आहे. सायंकाळी 7.30 पासून हा सामना सुरू होईल.
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात केदार जाधवने संथ खेळ केला होता. त्यामुळे जिंकण्याची स्थिती असूनही बुधवारी चेन्नईला 10 धावांनी निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्याच्या खेळण्यावर जोरदार टीका झाली. पण खेळाडूंना दीर्घ काळ संधी देण्याची चेन्नईचे धोरण असल्याने त्याला या सामन्यात वगळतात का, हे पहावे लागेल. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध वॅटसनला सूर गवसला तर फॅफ डय़ु प्लेसिसने सातत्य दाखविले असले तरी मध्य फळीची खराब कामगिरी हा कर्णधार धोनीच्या चिंतेचा विषय बनली आहे. स्वतः धोनीदेखील अपेक्षित प्रदर्शन करू शकलेला नाही. जाधवला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय झाल्यास रुतुराज गायकवाडला त्यांना पुन्हा संधी द्यावी लागेल किंवा एन. जगदीशनला स्थान द्यावे लागणार आहे. जगदीशनला 2018 पासून प्रत्यक्ष मैदानात खेळण्याची एकदाही संधी मिळालेली नाही.
फलंदाजीत चिंता असली तरी चेन्नईच्या गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले आहे. आधीच्या सामन्यात त्यांनी केकेआरला माफक धावसंख्येत रोखले होते. ब्रॅव्होलाही गोलंदाजीत लय सापडली असून त्याने या सामन्यात दोन बळी मिळविले होते. पीयूष चावलाच्या जागी घेण्यात आलेल्या कर्ण शर्माने दोन बळी मिळविताना फारशा धावाही दिल्या नाहीत. त्यामुळे आरसीबीविरुद्ध अशाच कामगिरीची अपेक्षा कर्णधार धोनी त्याच्याकडून करीत आहे. दीपक चहर, सॅम करण, शार्दुल ठाकुर या जलद गोलंदाजांकडून लवकर ब्रेकथ्रू मिळेल, अशीही त्याची अपेक्षा आहे. मात्र आरसीबीमध्ये धडाकेबाज फलंदाजांची फळी असल्याने त्यांच्यासमोर चेन्नईच्या गोलंदाजांची कसोटीच लागणार आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध कोहलीने शानदार अर्धशतक नोंदवले होते. पण त्यानंतर दिल्लीविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचे फलंदाज निष्प्रभ ठरले होते. त्यामुळे आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याचा प्रयत्न ते शनिवारच्या सामन्यात करतील. देवदत्त पडिक्कल, डीव्हिलियर्स देखील चांगल्या टचमध्ये असून अनेक वर्षापासून डीव्हिलियर्स हा त्यांचा प्रमुख खेळाडू बनलेला आहे. फिंच प्रारंभी जोरदार सुरुवात करून देऊ शकला तर आरसीबीला मोठी धावसंख्या रचता येऊ शकेल.
गोलंदाजीच्या विभागात मात्र चिंतेची स्थिती आहे. यजुवेंद्र चहल हा त्याचा नेहमीप्रमाणे प्रमुख गोलंदाज असून वॉशिंग्टन सुंदरनेही किफायतशीर गोलंदाजी केली आहे. मात्र त्यांचे वेगवान गोलंदाज लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकलेले नाहीत. उमेश यादव, शमी, सैनी यांनी बऱयाच धावा बहाल केल्या आहेत. चेन्नईचे फलंदाज व आरसीबीचे गोलंदाज आणि आरसीबीचे फलंदाज चेन्नईच्या गोलंदाजांसमोर कशी कामगिरी करतात, त्यावर सामन्याचे भवितव्य अवलंबून असेल.
संघ : चेन्नई सुपरकिंग्स : धोनी (कर्णधार), विजय, रायुडू, डय़ु प्लेसिस, वॅटसन, जाधव, ब्रॅव्हो, जडेजा, एन्गिडी, दीपक चहर, चावला, ताहिर, सँटनर, हॅझलवुड, शार्दुल ठाकुर, सॅम करण, एन.जगदीशन, केएम असिफ, मोनू कुमार, साई किशोर, रुतुराज गायकवाड, कर्ण शर्मा.
आरसीबी : कोहली (कर्णधार), डीव्हिलियर्स, पार्थिव पटेल, फिंच, फिलिप, मॉरिस, मोईन अली, सिराज, शाहबाज अहमद, पडिक्कल, चहल, सैनी, स्टीन, नेगी, उदाना, दुबे, उमेश यादव, गुरकीरत सिंग मान, सुंदर, पवन देशपांडे, झाम्पा.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.