वृत्तसंस्था/ शारजा
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत शनिवारी येथे होणाऱया सामन्यात धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जवर श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्सचे मोठे आव्हान असणार आहे. सदर सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल.
अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाची आतापर्यंतची कामगिरी समाधानकारक झाली असून ते स्पर्धेच्या गुणतक्त्यात सध्या वरच्या स्थानावर आहेत. मात्र, या स्पर्धेच्या इतिहासात वर्चस्व राखणाऱया चेन्नई संघाला आपले अस्तित्व राखण्यासाठी झगडावे लागत आहे. धोनीच्या कुशल नेतृत्वाखाली चेन्नई संघाने या स्पर्धेतील झालेल्या यापूर्वीच्या सामन्यात सनरायझर्स हैद्राबादचा पराभव करत आपल्या संघाला पुन्हा रूळावर आणले आहे. चेन्नई संघातील अनेक मातब्बर फलंदाज आपला सूर मिळविण्यासाठी झगडत आहेत. गोलंदाजीमध्ये सॅम करेन आणि दीपक चहार यांच्या कामगिरीवरच चेन्नईचे यश अवलंबून राहील. या स्पर्धेतील शारजामध्ये यापूर्वी झालेल्या दोन सामन्यात फिरकी गोलंदाजी प्रभावी ठरली होती. त्यामुळे शनिवारच्या सामन्यात रविंद्र जाडेजा, करण शर्मा आणि कदाचित चावला या तीन फिरकी गोलंदाजांना खेळविण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. आतापर्यंत तीन वेळा ही स्पर्धा जिंकणाऱया चेन्नई संघाने यापूर्वीच्या सामन्यात हैद्राबादवर विजय मिळविल्याने त्यांचा आत्मविश्वास निश्चितच वाढला असेल. पण दिल्ली कॅपिटल संघातील दक्षिण आफ्रिकेच्या रबाडा आणि नॉर्त्जे या वेगवान गोलंदाजांसमोर चेन्नईच्या फलंदाजीची सत्वपरीक्षा ठरणार आहे. चेन्नईच्या तुलनेत दिल्लीची गोलंदाजीची बाजू थोडी वरचढ वाटते. आर. अश्विन आणि अक्षर पटेल हे या संघातील उपयुक्त गोलंदाज आहेत.
दिल्ली कॅपिटल्स संघाने या स्पर्धेत आपले सातत्य राखत गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले आहे. पहिल्या दोन क्रमांकासाठी मुंबई आणि दिल्ली यांच्यात सध्या चुरस सुरू आहे. गेल्या बुधवारी झालेल्या राजस्थान रॉयल्स संघाविरुद्धच्या सामन्यात दिल्ली संघातील नवोदित वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे हा अधिक अनपेक्षित प्रभावी ठरला. कर्णधार अय्यरसमोर सध्या तंदुरुस्तीची समस्या भेडसावत आहे. शनिवारच्या सामन्यात तो तंदुरुस्त राहील, अशी अपेक्षा आहे. पण जर तो अन्फिट असेल तर मात्र दिल्ली संघाच्या फलंदाजीवर कदाचित विपरित परिणाम होऊ शकेल. दुखापतीमुळे ऋषभ पंत अद्याप पूर्ण तंदुरुस्त झालेला नाही. नवोदित सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉ, शिखर धवन यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे.