- प्राणी संग्रहालयातील 9 सिंह कोरोना पॉझिटिव्ह
ऑनलाईन टीम / चेन्नई :
कोरोना महामरीचा कहर आता माणसांनंतर वन्य प्राण्यांमध्येही दिसून येत आहे. चेन्नईजवळ असलेल्या वंडालूर अरिग्नार अण्णा प्राणिसंग्रहालयात कोरोनाने एका सिंहिणीचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 26 मे रोजी अरिग्नार अण्णा प्राणिसंग्रहालयाकडून एक प्रेस नोट जारी करण्यात आली होती. त्यामध्ये म्हटले होते की, प्राणिसंग्रहालयातील ॲनिमल हाऊस 1 मध्ये ठेवण्यात आलेल्या 5 सिंहांमध्ये एनोरेक्सिया (भूक न लागणे) आणि अधून-मधून खोकला येत असल्याची लक्षणे दिसली आहेत.
त्यानंतर सिंहांच्या रक्ताचे नमुने हे तामिळनाडू पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठात पाठण्यात आले असल्याचे प्राणिसंग्रहालयाकडून सांगण्यात आले होते.
त्यातच आता प्राणी संग्रहालयातील 9 वर्षांच्या निला नावाच्या सिंहिणीचा 3 जूनला संध्याकाळी 6.15 वाजता कोरोनाने मृत्यू झाला आहे. निला सिंहिणीला कोरोनाची लागण झाली होती. एक दिवसापूर्वीच तिच्या नाकातून स्त्राव येत होता, अशी माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, प्राणिसंग्रहालयातील 11 पैकी 9 सिंहांचा कोरोना चाचणी रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये विष्टा आणि स्वॅबची चाचणी भोपाळमध्ये करण्यात आली होती. त्यांच्या रिपोर्टची पडताळणी करण्यासाठी भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था (बरेली) आणि सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (हैदराबाद) येथे पाठवण्यात आले आहेत. सध्या सर्व सिंहांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
वाघ आणि सिंहामध्ये कोरोनाचा संसर्ग हा सर्वप्रथम बार्सिलोना (स्पेन) आणि अमेरिकेतील ब्रोंक्स प्राणिसंग्रहालयात आढळून आला होता. त्यानंतर देशात हैदराबादमधील प्राणिसंग्रहालयाती 8 सिंह कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. सिंहांना कोरोना संसर्ग होण्याची ही पहिलीच घटना होती. यानंतर काही दिवसांनी उत्तर प्रदेशातील इटावामध्ये देखील एक सिंह कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता.