वृत्तसंस्था/ चेन्नई
तिरुचिरापल्ली आणि चेन्नई विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी मिळाल्यानंतर या दोन्ही विमानतळावर मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस दलाने या ठिकाणी सीआयएसएफच्या जवानांच्या मदतीने शोध मोहिम राबवली. सुमारे 200 प्रवाशांना खबरदारी म्हणून सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. तर शोध मोहिमेसाठी मेटल डिटेक्टर आणि श्वान पथकाचेही सहाय्य घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. काही विमानसेवा तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आल्याचेही विमानतळ प्राधिकरणाच्यावतीने सांगण्यात आले.