दोन्ही संघ मागील सामन्यातील विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी प्रयत्नशील,
मुंबई / वृत्तसंस्था
तीनवेळचे चॅम्पियन्स चेन्नई सुपरकिंग्स व संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स आज (दि. 19) होणाऱया साखळी सामन्यात मागील विजयाचा धडाका कायम राखण्याचा प्रयत्न करतील. दोन्ही संघांनी यापूर्वी आपला मागील सामना जिंकला आहे. आजच्या लढतीला सायंकाळी 7.30 वाजता सुरुवात होईल.
चेन्नई व राजस्थान या दोन्ही संघांना मोसमातील पहिल्या लढतीत पराभव पत्करावे लागले होते. त्यानंतर विजयाच्या ट्रकवर येण्यात ते यशस्वी ठरले. एकीकडे, चेन्नईने पंजाब किंग्सविरुद्ध यशाची चव चाखली तर दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सला डावातील शेवटच्या षटकात अस्मान दाखवले. चेन्नईच्या विजयात मध्यमगती गोलंदाज दीपक चहरचा भेदक मारा निर्णायक ठरला होता.
आता आजच्या लढतीतही चहर भेदक गोलंदाजी साकारेल, अशी अपेक्षा चेन्नईला असणार आहे. त्याच्या साथीला सॅम करण, शार्दुल ठाकुर समयोचित योगदान देण्यासाठी प्रयत्नशील असतील. दक्षिण आफ्रिकन जलद गोलंदाज लुंगी एन्गिडी क्वारन्टाईनमधून बाहेर आला असून तो संघात दाखल झाल्यास चेन्नईची जलद गोलंदाजी आणखी बळकट होईल.
इंग्लिश अष्टपैलू मोईन अलीने पंजाबविरुद्ध विजयात मोलाचे योगदान दिले होते. शिवाय, फॅफ डय़ू प्लेसिसने नाबाद 36 धावांची लक्षवेधी खेळी साकारत आपण फॉर्ममध्ये परतत असल्याचा दाखला दिला. ऋतुराज गायकवाड, अम्बाती रायुडू यांना मोठय़ा खेळीची प्रतीक्षा आहे. रैनाचा फॉर्म देखील चेन्नईसाठी महत्त्वाचा ठरेल. सलामी लढतीत शून्यावर बाद झालेल्या धोनीने पंजाबविरुद्ध फलंदाजी केली नव्हती. आता येथे तो बढतीवर येणार का, हे पहावे लागेल.
राजस्थानचे मनोबल उंचावलेले
मागील लढतीत दिल्ली कॅपिटल्सला नमवणाऱया राजस्थान रॉयल्सचे मनोबल येथे उंचावलेले असणार आहे. कर्णधार संजू सॅमसनने धुवांधार शतक साजरे करत फॉर्म दाखवून दिला तर जोस बटलर, डेव्हिड मिलर यांनी सातत्य राखले तर या संघाला निश्चितच भरीव आशाअपेक्षा असतील.
यापूर्वी, दिल्लीविरुद्ध राजस्थानची आघाडी फळी अपयशी ठरली होती. त्यानंतर मिलर, मॉरिस यांनी डाव सावरला होता. अनुभवी गोलंदाज जयदेव उनादकटचा स्पेल लक्षवेधी ठरला होता. मॉरिस व मुस्तफिजूर यांचा अनुभव मोक्याच्या क्षणी महत्त्वाचा ठरु शकतो.
प्रतिस्पर्धी संघ
चेन्नई सुपरकिंग्स ः महेंद्रसिंग धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सुरेश रैना, अम्बाती रायुडू, केएम असिफ, दीपक चहर, डेव्हॉन ब्रेव्हो, फॅफ डय़ू प्लेसिस, इम्रान ताहीर, एन. जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सॅन्टनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, सॅम करण, आर. साई किशोर, मोईन अली, के. गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, सी. हरी निशांत.
राजस्थान रॉयल्स ः संजू सॅमसन (कर्णधार व यष्टीरक्षक), जोस बटलर (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, मनन वोहरा, अनूज रावत, रियान पराग, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, महिपाल लोमरोर, श्रेयस गोपाल, मयांक मार्कंडे, ऍन्डय़्रू टाय, जयदेव उनादकट, कार्तिक त्यागी, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, मुस्तफिजूर रहमान, चेतन साकरिया, केसी करिअप्पा, लियाम लिव्हिंगस्टोन, कुलदीप यादव, आकाश सिंग.