चेन्नई सुपरकिंग्स (सीएसके) आयपीएल इतिहासातील सर्वात सातत्यपूर्ण योगदान देणारा संघ. पण, यंदा त्यांच्या आव्हानात काहीच जान राहिलेली नाही. अगदी या संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी आपला संघ तिन्ही आघाडय़ांवर अपयशी ठरला असल्याची जाहीर कबुली दिली. त्यानंतर आता चेन्नईचे वरिष्ठ व्यवस्थापन संघावर बरेच नाराज असल्याची चर्चा आहे. संघव्यवस्थापन खेळाडूंवर खूपच नाराज असून काही खेळाडूंची नजीकच्या कालावधीत उचलबांगडी होऊ शकते, असेही संकेत आहेत.
चेन्नईसाठी यंदाचा हंगाम खूपच निराशाजनक स्वरुपाचा ठरला आहे. आतापर्यंत झालेल्या 10 पैकी केवळ 3 सामन्यातच ते विजय मिळवू शकले आहेत. सांख्यिकी पाहता चेन्नईला आता देखील प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवता येऊ शकते. पण, अगदी एक पराभव स्वीकारावा लागला तरी त्यांच्या सर्व आशाअपेक्षा संपुष्टात येतील. संघातील मुख्य खेळाडू अपेक्षेला खरे उतरलेले नाहीत, ही त्यांची मुख्य चिंता आहे.
शेन वॅटसन, फॅफ डय़ू प्लेसिस, महेंद्रसिंग धोनी, अम्बाती रायुडू संघात कायम आहेत. पण, उत्तम सुरुवात मिळवून दिली गेली तरी या संघाला अपयशाचाच अधिक सामना करावा लागला आहे. अगदी धोनीच्या नेतृत्वावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्याने केदार जाधवसारख्या खेळाडूची पाठराखण करणे प्रश्नांकित आहे. त्यामुळे, पुढील हंगामापूर्वी या संघातील काही खेळाडू बाहेर फेकले गेले तर त्यात आश्चर्याचे कारण नसेल.
कोणत्या खेळाडूंना वगळणार?
चेन्नई संघात 30 पेक्षा अधिक वयाच्या खेळाडूंचा अधिक भरणा आहे. पण, आता संघ निराशा करत असल्याने खेळाडूंचा ताफा बदलला जाणार व युवा खेळाडूंची अधिक वर्णी लावली जाईल, असे संकेत आहेत. शेन वॅटसन, पियुष चावला, केदार जाधव, इम्रान ताहीर अशा वरिष्ठ खेळाडूंना संघातून अर्धचंद्र मिळू शकतो. सुरेश रैना व हरभजन सिंग यांचा 3 वर्षांचा करार यापूर्वीच संपुष्टात आणला गेला आहे.
धोनीबाबत काय निर्णय घेणार?
39 वर्षीय धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्ती स्वीकारली असून या हंगामातील त्याचा खराब फॉर्म संघव्यवस्थापनासाठी चिंतेचा ठरत आला आहे. स्वतः धोनीने देखील आपण आयपीएल आणखी किती खेळणार, हे स्पष्ट केलेले नाही. पण, धोनीशिवाय चेन्नई सुपरकिंग्स प्रँचायझीची कल्पना करणे देखील या संघाच्या चाहत्यांना कठीण असणार आहे. धोनीचा फॉर्म असाच कायम राहिला तर 2021 ची आयपीएल त्याच्यासाठी शेवटची असू शकते, असा प्रातिनिधीक होरा आहे.