मुंबई / वृत्तसंस्था
यंदा पहिले सलग दोन्ही सामने गमावणाऱया चेन्नई सुपरकिंग्सची आज (रविवार दि. 3) पंजाब किंग्सविरुद्ध आयपीएलमधील साखळी लढत होत आहे. रविंद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ या लढतीत विजयाच्या ट्रकवर येणार का, याची येथे उत्सुकता असेल. ही लढत सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाणार आहे.
यंदा चेन्नईची हंगामातील सुरुवात अतिशय खराब स्वरुपाची झाली. त्यांना पहिल्या सामन्यात केकेआरविरुद्ध तर दुसऱया सामन्यात आयपीएल पदार्पण करणाऱया लखनौ सुपरजायंट्स संघाविरुद्ध पराभव पत्करावा लागला. पहिल्या लढतीत चेन्नईची फलंदाजी लाईनअप अपयशी ठरली तर दुसऱया लढतीत डय़ू फॅक्टर कारणीभूत ठरला आणि त्यांच्या गोलंदाजांना द्विशतकी धावसंख्येचेही संरक्षण करता आले नाही.
चेन्नईला यंदा जलद गोलंदाज दीपक चहर, ऍडम मिल्ने व डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट ख्रिस जॉर्डन यांची प्रकर्षाने उणीव जाणवत राहिली आहे. लखनौविरुद्ध अष्टपैलू शिवम दुबेकडे 19 वे षटक सोपवणे भाग होते आणि दुबेच्या या षटकात 25 धावा फटकावल्या गेल्यानंतर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. डेव्हॉन ब्रेव्होच्या गोलंदाजीत सातत्य असले तरी अन्य गोलंदाजांची यथोचित साथ लाभत नाही, ही मुख्य चिंता आहे. स्वतः रविंद्र जडेजा देखील अद्याप पूर्ण बहरात आलेला नाही.
दुसरीकडे, पंजाब किंग्सच्या संघात काही अव्वल बिग-हिटर्स आहेत. मात्र, केकेआरविरुद्ध त्यांनाही अपयशाचा सामना करावा लागला आहे. मागील लढतीत पराभव पत्करावा लागल्यानंतर येथे विजयाच्या ट्रकवर परतण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. मयांक अगरवाल, शिखर धवन, भानुका राजपक्ष यांच्यासारखे फलंदाज कोणत्याही गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याची क्षमता राखून आहेत. पंजाबच्या गोलंदाजीची भिस्त रबाडा, राहुल चहर, हरप्रीत ब्रार यांच्यावर असणार आहे.