नवी मुंबई / वृत्तसंस्था
आयपीएल स्पर्धेतील सेन्टिमेन्टल फेवरीट्स चेन्नई सुपरकिंग्सला या हंगामातील सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. युवा फलंदाज अभिषेक शर्माने 50 चेंडूत 75 धावांची आतषबाजी केल्यानंतर हैदराबादने 8 गडी राखून एकतर्फी विजय नोंदवला. प्रारंभी चेन्नईला 20 षटकात 7 बाद 154 धावांवर समाधान मानावे लागले तर प्रत्युत्तरात हैदराबादने 17.4 षटकात 2 बाद 155 धावांसह सहज विजयश्री मिळवली.
21 वर्षीय अभिषेक शर्माने 5 चौकार व 3 षटकारांची आतषबाजी करत चेन्नईच्या गोलंदाजांची उत्तम धुलाई केली. त्याच्या फटकेबाजीमुळे हैदराबादने विजयासाठी 155 धावांचे आव्हान 17.4 षटकातच सर केले.
पंजाबच्या डावखुऱया अभिषेक शर्माला सनरायजर्सने मेगा ऑक्शनमध्ये 6.5 कोटी रुपयांना करारबद्ध केले असून त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळेच सनरायजर्सला या हंगामातील पहिला विजय नोंदवता आला आहे. यापूर्वी पहिल्या दोन लढतीत त्यांना राजस्थान रॉयल्स व लखनौ सुपरजायंट्स यांच्याविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नईला यंदा पहिल्या 3 लढतीत अनुक्रमे केकेआर, लखनौ व पंजाब किंग्सविरुद्ध पराभूत व्हावे लागले आहे.
चेन्नईला 7 बाद 154 धावांवर रोखल्यानंतर अभिषेकने चौफेर फटकेबाजी करत कर्णधार केन विल्यम्सनवरील दडपण बरेच दूर केले. अभिषेकचा फॉर्म पाहत विल्यम्सनने दुय्यम भूमिकेवर अधिक भर देत 40 चेंडूत 32 धावांचे योगदान दिले. विल्यम्सन 13 व्या षटकात डावखुरा सीमर मुकेश चौधरीच्या (1-30) गोलंदाजीवर बाद झाला. त्यापूर्वी विल्यम्सनने अभिषेकसमवेत 89 धावांची भागीदारी साकारली. अभिषेक डावातील 18 व्या षटकात डेव्हॉन ब्रेव्होच्या गोलंदाजीवर बाद झाला, त्यावेळी सनरायजर्सला विजयासाठी केवळ 10 धावांची आवश्यकता होती.
राहुल त्रिपाठीने या लढतीत 15 चेंडूत जलद 39 धावा फटकावल्या. त्याने ब्रेव्होला ग्लान्स करत चौकार मिळवला आणि येथेच हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. अभिषेक शर्माला 62 धावांवर ब्रेव्होच्या गोलंदाजीवर रविंद्र जडेजाने जीवदान दिले. मात्र, तोवर चेन्नईच्या हातातून हा सामना निसटलेला होता. चेन्नईचे सर्व 6 गोलंदाज येथे महागडे ठरले.
मोईन अलीची फटकेबाजी
प्रारंभी, प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर चेन्नईला मोईन अलीच्या फटकेबाजीनंतरही माफक धावसंख्येवर समाधान मानावे लागले. मोईन अलीने 35 चेंडूत 48 धावांचे योगदान दिले. कर्णधार रविंद्र जडेजाने 15 चेंडूत जलद 23 धावा केल्या. रॉबिन उत्थप्पाला 15 धावांवर परतावे लागले होते. हैदराबादतर्फे वॉशिंग्टन सुंदर व टी. नटराजन यांनी प्रत्येकी 2 तर भुवनेश्वर, जान्सन व मॅरक्रम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपरकिंग्स ः 20 षटकात 7 बाद 154 (मोईन अली 35 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह 48, अम्बाती रायुडू 27 चेंडूत 4 चौकारांसह 27, रविंद्र जडेजा 15 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह 23, अवांतर 5. वॉशिंग्टन सुंदर 2-21, टी. नटराजन 2-30, भुवनेश्वर, जान्सन, मॅरक्रम प्रत्येकी 1 बळी).
सनरायजर्स हैदराबाद ः 17.4 षटकात 2 बाद 155 (अभिषेक शर्मा 50 चेंडूत 5 चौकार, 3 षटकारांसह 75, केन विल्यम्सन 32, राहुल त्रिपाठी 15 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह 39, निकोलस पूरन 2 चेंडूत नाबाद 5. अवांतर 4. मुकेश चौधरी, डेव्हॉन ब्रेव्हो प्रत्येकी 1 बळी).
चेन्नईला उर्वरित 10 सामन्यात किमान 8 विजयांची आवश्यकता
प्ले-ऑफ क्वॉलिफिकेशनकरिता 16 गुणांची मॅजिक फिगर गाठण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्सला आता उर्वरित 10 सामन्यात किमान 8 विजय मिळवावाच लागणार आहे.