आयपीएल टी-20 : धोनीसेनेला फलंदाजीतील अपयश, खराब क्षेत्ररक्षणाचा फटका, सनरायजर्स हैदराबाद 7 धावांनी विजयी
वृत्तसंस्था/ दुबई
हैदराबाद सनरायजर्स संघाने शुक्रवारी आयपीएल साखळी सामन्यात धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्स संघाला धूळ चारत एकच खळबळ उडवून दिली. प्रारंभी, हैदराबादने प्रियम गर्ग (26 चेंडूत नाबाद 51) व अभिषेक शर्मा (24 चेंडूत 31) यांच्या 77 धावांच्या भागीदारीनंतर 20 षटकात 5 बाद 164 धावा केल्या तर प्रत्युत्तरात चेन्नईला 20 षटकात 5 बाद 157 धावांपर्यंत मजल मारता आली.
चेन्नईचा हा या हंगामातील सलग तिसरा पराभव ठरला. पण, शेवटच्या 4 षटकात 78 धावांची गरज असताना 71 धावांची केलेली आतषबाजी त्यांची जिद्द दर्शवणारी ठरली. भुवनेश्वरला गोलंदाजी करत असताना दुखापत झाल्याने तो षटक पूर्ण करु शकला नव्हता.
165 धावांचे आव्हान असताना अनुभवी शेन वॅटसन व अम्बाती रायुडू स्वस्तात बाद झाले तर केदार जाधवने देखील तोच कित्ता गिरवला. रविंद्र जडेजाने 35 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारांसह 50 धावांची आतषबाजी केली. मात्र, मोक्याच्या क्षणी तो बाद झाल्याने चेन्नईला आणखी एक धक्का बसला. धोनीने (36 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 47) अंतिम टप्प्यात फटकेबाजी करण्यावर भर दिला. पण, तोवर हा सामना चेन्नईच्या हातातून निसटला होता.
तत्पूर्वी, युवा फलंदाज प्रियम गर्गच्या 26 चेंडूतील नाबाद 51 धावांच्या खेळीमुळे सनरायजर्स हैदराबाद संघाने चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध आयपीएल साखळी सामन्यात 20 षटकात 5 बाद 164 धावांपर्यंत मजल मारली.
मागील काही लढतीप्रमाणे हैदराबादची मध्यफळी पुन्हा एकदा कोसळेल व त्यामुळे 150 धावांचा टप्पाही सर केला जाणार नाही की काय, अशी धास्ती या प्रँचायझीला जरुर होती. पण, प्रत्यक्षात प्रियम गर्गचे इरादे वेगळे होते. त्याने चेन्नईच्या जवळपास प्रत्येक गोलंदाजावर जोरदार हल्ला चढवला. चेन्नईचे खराब क्षेत्ररक्षणही हैदराबादच्या पथ्यावर पडले.
वास्तविक, केन विल्यम्सन धावचीत झाल्यानंतर हैदराबादचा संघ अडचणीतच होता. पण, 2020 युवा-19 विश्वचषक स्पर्धेतील भारतीय कर्णधार प्रियम गर्ग यावेळी संघाचा तारणहार ठरला. गर्गच्या 51 धावांच्या खेळीत 6 चौकार व एका षटकाराचा समावेश राहिला. याशिवाय, त्याने अभिषेक शर्मासमवेत पाचव्या गडय़ासाठी साकारलेली 77 धावांची भागीदारी तितकीच महत्त्वपूर्ण ठरली. चहरच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक-कर्णधार धोनीकरवी झेलबाद होण्यापूर्वी अभिषेकने 24 चेंडूत 31 धावांचे योगदान दिले. या भागीदारीमुळेच हैदराबादला 150 धावांचा टप्पा सहज सर करता आला.
प्रियम व अभिषेकच्या फटकेबाजीमुळे हैदराबादने शेवटच्या 5 षटकात 64 धावांची आतषबाजी केली. तत्पूर्वी, प्रारंभी सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर जॉनी बेअरस्टोचे शून्यावर बाद होणे या संघासाठी धक्कादायक ठरले. दीपक चहरने त्याला त्रिफळाचीत केले. अनुभवी मनीष पांडेने शार्दुलच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी 21 चेंडूत 29 धावा वसूल केल्या. केन विल्यम्सन अस्तित्वात नसलेली एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचीत झाला. त्यानंतर मात्र प्रियम गर्ग व अभिषेक शर्मा यांनी जोरदार फटकेबाजी केली.
अभिषेक नंतर चहरच्या गोलंदाजीवर धोनीकरवी झेलबाद झाला. प्रियम गर्ग 26 चेंडूत 51 तर अब्दुल समद 6 चेंडूत 8 धावांवर नाबाद राहिले. दीपक चहरने 31 धावात 2 तर शार्दुल ठाकुर व पियुष चावला यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
शेवटच्या षटकात काय घडले?
हैदराबादचा गोलंदाज अब्दुल समदच्या डावातील शेवटच्या षटकात विजयासाठी 28 धावांची गरज असताना वाईड व बाईजच्या 4 अशा 5 धावा चेन्नईच्या खात्यात वसूल झाल्या आणि त्यामुळे त्यांच्या आशा नव्याने पल्लवित झाल्या होत्या. पण, अपेक्षित फटकेबाजी न करता आल्याने त्यांना विजयापासून दूर रहावे लागले. धोनीने प्रथम दुहेरी धाव घेऊन नंतर चौकार वसूल केला आणि 4 चेंडूत 17 धावा, असे नवे समीकरण झाले. तिसऱया चेंडूवर धोनीला एकेरी धाव घेता आली. 3 चेंडूत 16 धावांची गरज असताना पुढील दोन चेंडूंवर सॅम करण व धोनी यांना फक्त एकेरी धाव घेता आली आणि चेन्नईच्या उरल्यासुरल्या आशाअपेक्षा संपुष्टात आल्या. शेवटच्या चेंडूवर 14 धावांची गरज असताना करणने खेचलेला षटकार औपचारिक ठरला.
धावफलक
सनरायजर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर झे. डय़ू प्लेसिस, गो. चावला 28 (29 चेंडूत 3 चौकार), जॉनी बेअरस्टो त्रि. गो. चहर 0 (3 चेंडू), मनीष पांडे झे. करण, गो. ठाकुर 29 (21 चेंडूत 5 चौकार), केन विल्यम्सन धावचीत (रायुडू-धोनी) 9 (13 चेंडूत 1 चौकार), प्रियम गर्ग नाबाद 51 (26 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), अभिषेक शर्मा झे. धोनी, गो. चहर 31 (24 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), अब्दुल समद नाबाद 8 (6 चेंडू). अवांतर 8. एकूण 20 षटकात
5 बाद 164.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-1 (जॉनी बेअरस्टो, 0.4), 2-47 (मनीष पांडे, 7.1), 3-69 (वॉर्नर, 10.5), 4-69 (विल्यम्सन, 10.6), 5-146 (अभिषेक शर्मा, 17.6).
गोलंदाजी : दीपक चहर 4-0-31-2, सॅम करण 3-0-37-0, शार्दुल ठाकुर 4-0-32-1, डेव्हॉन ब्रेव्हो 4-0-28-0, पियुष चावला 3-0-20-1, रविंद्र जडेजा 2-0-16-0.
चेन्नई सुपरकिंग्स : फॅफ डय़ू प्लेसिस धावचीत (गर्ग-बेअरस्टो) 22 (19 चेंडूत 4 चौकार), शेन वॅटसन त्रि. गो. कुमार 1 (6 चेंडू), अम्बाती रायुडू त्रि. गो. नटराजन 8 (9 चेंडूत 1 चौकार), केदार जाधव झे. वॉर्नर, गो. समद 3 (10 चेंडू), महेंद्रसिंग धोनी नाबाद 47 (36 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), रविंद्र जडेजा झे. अब्दुल समद, गो. नटराजन 50 (35 चेंडूत 5 चौकार, 2 षटकार), सॅम करण नाबाद 15 (5 चेंडूत 2 षटकार). अवांतर 11. एकूण 20 षटकात 5 बाद 157.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-4 (शेन वॅटसन, 2.3), 2-26 (रायुडू, 5.1), 3-36 (प्लेसिस, 5.6), 4-42 (केदार जाधव, 8.2), 5-114 (रविंद जडेजा 17.4).
गोलंदाजी : भुवनेश्वर 3.1-0-20-1, खलील अहमद 3.5-0-34-0, टी. नटराजन 4-0-43-2, अभिषेक शर्मा 1-0-4-0, रशीद खान 4-0-12-0, अब्दुल समद 4-0-41-1.