प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्ह्यातील वयस्कर महिलांना लक्ष्य करून चेन स्नॅचिंग करणाऱ्या पोलीस रेकॉर्डवरील संशयितांकडून चार जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्यांच्याकडून सुमारे 2 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पोलीस अधीक्षक बन्सल म्हणाले, दोन संशयित मनोज जगदीश शिंदे, (वय 25, रा. कोडोली), दिनेश भरत दिंडे (वय 36, रा. गव्हाणवाडी, ता. पाटण) या आरोपींनी सातारा शहर हद्दीमध्ये काही दिवसापूर्वी एका वयस्कर महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने पळवल्याची माहिती मिळाली. संबंधित दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सातारा शहर, रहिमतपूर, कराड अशा वेगवेगळ्या ठिकाणी चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचे कबूल केले. त्यांनी दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने खात्री केली असता त्यांनी जिल्ह्यांमध्ये चार गुन्हे केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून 2 लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 40 हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण 2 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.