युक्रेनमधील छोटय़ा लोकवस्त्या आणि लहान शहरे ताब्यात घेण्याचा सपाटा रशियाने लावला आहे. रशियापासून साधारणतः 30 किलोमीटर अंतरावर असणाऱया चेर्निहिव हे शहर नुकतेच रशियाने ताब्यात घेतले. मात्र, या प्रक्रियेत हे शहर पूर्णतः उद्ध्वस्त झाले असून त्यातील एकही इमारत वाचलेली नाही. शहरामध्ये सर्वत्र पडलेल्या इमारतींचे ढिगारे, घरदार गमावल्याने रस्त्यावर उघडय़ावर पडलेली माणसे आणि कडाक्याच्या थंडीत कशीबशी स्वतःला वाचविणारी बालके असे भयावह दृश्य या शहरात दिसून येते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
पडलेल्या इमारतींच्या ढिगाऱयांमुळे ठिकठिकाणी रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून शहरातून बाहेर पडणेही नागरिकांना कठीण झाले आहे. त्यातच तापमान उणे 3 डिग्री असल्याने थंडीचे नवे आव्हान उभे ठाकले आहे. आतापर्यंत या शहरात 38 स्त्राr-पुरुषांनी व काही बालकांनी प्राण गमावले आहेत. रशियाच्या वायुहल्ल्यात सर्व सरकारी इमारती उद्ध्वस्त झाल्या असून जवळपास 2 लाख 85 हजार लोकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. सरकारी साहाय्यता यंत्रणा बंद पडल्याने लोक स्वतःच कसेबसे इमारतींचे ढिगारे बाजूला करून कोणी जिवंत राहिले आहे का? याची तपासणी करताना दिसतात. हे सर्व दृश्य हृदय पिळवटणारे असून 21 व्या शतकाच्या पूर्वार्धात अशी परिस्थिती एखाद्या मानव समुदायावर येऊ शकते, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे, असे मत अनेक प्रत्यक्षदर्शींनी विविध वृत्तसंस्थांशी बोलताना व्यक्त केले आहे.