प्रिमियर लीगमधील सामन्यात अलोन्सोचा गोल ठरला निर्णायक
वृत्तसंस्था/ मँचेस्टर
चेल्सीने मँचेस्टर सिटीचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करून प्रिमियर लीग जेतेपदाची सिटीची पार्टी आणखी थोडी लांबणीवर टाकली. चेल्सीची आता अव्वल चार संघात स्थान मिळवित शेवट करण्याची शक्यताही वाढली आहे.
चॅम्पियन्स लीग स्पर्धेची अंतिम लढत याच दोन संघांत होणार असून येथील सामना म्हणजे त्याची रंगीत तालीमच होती. रहीम स्टर्लिंगने यजमान मँचेस्टरला मध्यंतराआधी आघाडी मिळवून दिली. पण हकिम झियेचने चेल्सीला बरोबरी साधून दिल्यानंतर मार्कोस अलोन्सोने सामन्याच्या अंतिम क्षणात विजयी गोल नोंदवला. सिटीला पुढचा सामना खेळण्याआधीच जेतेपदाचा मुकुट मिळू शक्यता आहे. पण इतर सामन्यांच्या निकालावर ते अवलंबून असेल. दुसऱया स्थानावर असणाऱया मँचेस्टर युनायटेडचे अजून तीन सामने बाकी असून सिटीचा पुढील सामना शुक्रवारी न्यूकॅसल संघाविरुद्ध होणार आहे.
येथील विजयानंतर चेल्सी तिसऱया स्थानावर पोहोचले असून पाचव्या स्थानावरील वेस्ट हॅमपेक्षा ते सहा गुणांनी पुढे आहेत आणि त्यांचे अद्याप तीन सामने बाकी आहेत. दुसऱया स्थानावरील मँचेस्टर युनायटेडपेक्षा मँचेस्टर सिटी संघ तब्बल 13 गुणांनी पुढे असल्याने ते चार वर्षातील तिसरे प्रिमियर लीग जेतेपद मिळविणार यात शंका नाही. मात्र ते निश्चित होणे बाकी आहे.