वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडमधील सेकंड टियर महिलांची फुटबॉल स्पर्धा कोरोना महामारी संकटामुळे अर्धवट स्थितीत थांबवावी लागली होती. दरम्यान, शुक्रवारी इंग्लंड फुटबॉल संघटनेने महिलांच्या सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत चेल्सी महिला फुटबॉल संघाला विजेता म्हणून घोषित केले तर सेकंड टियर महिलांच्या फुटबॉल स्पर्धेत ऍस्टोन व्हिला संघाला विजेता म्हणून जाहीर करण्यात आले.
2019-20 च्या एफए महिलांच्या सुपरलीग आणि एफए महिला चॅम्पियनशीप फुटबॉल स्पर्धेतील विजेता घोषित करण्यासाठी संघटनेला प्रत्येक सामन्यातील संघाच्या कामगिरीचा आढावा घ्यावा लागला. कोरोना महामारीमुळे या दोन्ही स्पर्धा अर्धवट स्थितीत स्थगित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेच्या गुणतक्त्यातील कामगिरीनुसार आघाडीवर असलेल्या संघाला विजेता म्हणून पसंती देण्याचा निर्णय इंग्लंड फुटबॉल संघटनेच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. या निर्णयानुसार 2019-20 च्या बार्कले एफए महिलांच्या सुपरलीग स्पर्धेचे जेतेपद चेल्सीच्या महिला संघाला देण्यात आले. तर 2019-20 च्या एफए महिलांच्या चॅम्पियनशीप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद ऍस्टोन व्हिला महिला संघाला देण्यात आले. चेल्सी संघाने गुणतक्त्यात नजीकच्या मँचेस्टर सिटीला एका गुणाने मागे टाकले. पुढील वर्षीच्या हंगामात होणाऱया महिलांच्या चॅम्पियन्स लीग स्पर्धेसाठी चेल्सी आणि मँचेस्टर सिटी हे दोन्ही संघ पात्र ठरले आहेत.