टायब्रेकपर्यंत रंगलेल्या अंतिम लढतीत डिंग लिरेनची बाजी
चेन्नई / वृत्तसंस्था
युवा भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदला मेल्टवॉटर चॅम्पियन्स चेस टूर चेसेबल मास्टर्स 2022 ऑनलाईन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. टायब्रेकपर्यंत रंगलेल्या फायनलमध्ये आर. प्रज्ञानंदला जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकित डिंग लिरेनविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. डिंग लिरेनने 49 चालीत विजय मिळवत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
अंतिम लढतीतीतील पहिल्या सेटमध्ये आर. प्रज्ञानंदला 1.5-2.5 फरकाने पराभव पत्करावा लागला. पण, दुसऱया सेटमध्ये त्याने 2.5-1.5 अशा फरकाने बाजी मारत बरोबरी साधली. त्यानंतर टायब्रेकचा अवलंब करणे भाग होते. पुढे, पहिला ब्लित्झ गेम बरोबरीत राहिल्यानंतर दुसऱया ब्लित्झ गेममध्ये चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेनने 49 चालीत विजय मिळवला.
त्याआधी, लढत टायब्रेकमध्ये पोहोचण्यापूर्वी प्रज्ञानंदने 79 चालीत मिळवलेला विजय स्पृहणीय ठरला. त्यानंतर पुढील लढत 106 चालीतील जोरदार संघर्षानंतर बरोबरीत सोडवला गेला आणि फायनलमध्ये टायब्रेकचा अवलंब करावा लागेल, हे स्पष्ट झाले. फायनल लढतीनंतर आर. प्रज्ञानंदचे प्रशिक्षक आर. बी. रमेश यांनी प्रज्ञानंदच्या खेळाचे मुक्तकंठाने कौतुक केले. भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंदने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्याच्यापेक्षा सरस मानांकित डचमन अनिश गिरीला पराभवाचा धक्का दिला. त्याने दुसऱयांदा मॅग्नस कार्लसनला नमवण्याचा पराक्रमही यादरम्यान गाजवला.