प्रतिनिधी/ वडूज
वडूज (ता.खटाव) येथील चैतन्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अपहार प्रकरणातील प्रमुख संशयीत संजय दिगंबर इनामदार यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंबईतून अटक केली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील चैतन्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत अपहाराची घटना घडली होती. याप्रकरणी सुमारे 27 कोटी रूपये व सोने तारणचा अपहार केल्याचा आरोप पतसंस्थेचे प्रमुख संजय इनामदार व सहकाऱयांवर 16 मे 2019 रोजी आर्थिक गुन्हे शाखेने एम. पी. आय. डी. कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पोलिसांना चकवा देत म्हणा किंवा अन्य तांत्रिक गोष्टीचा आधार घेत इनामदार हे फरारी होते. इनामदार व अन्य सहकायांना तातडीने अटक करावी अन्यथा सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा ठेवीदारांनी दिला होता.
त्याची गांभिर्याने दखल घेत आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी इनामदार यास मुंबई येथे काल (सोमवारी ता.7) रात्री अटक केली. आज सकाळी इनामदार यास येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आले, त्यावेळी ठेवीदार व नागरिकांची गर्दी झाली होती. इनामदार यास अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
————–