ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी, उद्योगपती मेहुल चोक्सीला परत आणण्यासाठी भारतीय जेट डोमिनिका येथे दाखल झाले आहे. अँटिग्वामधून पोबारा केलेला चोक्सी बुधवारी क्युबाला जाताना डोमिनिकामध्ये पकडला गेला. चोक्सीकडे अँटिग्वाचे नागरिकत्व आहे. मात्र, त्याच्या काळ्या कर्तृत्वाने परेशान झालेल्या अँटिग्वियन सरकारने त्याला भारताच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चोक्सीला या खासगी जेटद्वारे भारतात आणले जाऊ शकते.
अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी डोमिनिकाच्या डग्लस-चार्ल्स विमानतळावर भारतातून एक खासगी जेट आल्याची पुष्टी केली आहे. फरार मेहुल चोक्सी सध्या डोमिनिका पोलिसांच्या ताब्यात आहे.
दरम्यान, डोमिनिका जेलमधील चोक्सीचा मारहाणीचा फोटो समोर आला आहे. चोक्सीच्या वकिलांचा दावा आहे की, जेलमध्ये चोक्सीला बेदम मारहाण करण्यात आली. समोर आलेल्या फोटोमध्ये चोक्सीच्या हातावर जखमांचे व्रण आहेत. त्याचे डोळेही रक्ताळलेले दिसत आहेत.