सार्दिन यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तृळात खळबळ चोडणकर यांच्याबद्दल काढले अपशब्द
प्रतिनिधी /मडगाव
दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याबद्दल अपशब्द काढले असून त्यासंदर्भातील व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तृळात खळबळ माजली आहे. प्रदेश अध्यक्ष चोडणकरसह इतरांनी सामुदायिक राजीनामे द्यावेत, अशी मागणी देखील खासदार सार्दिन यांनी केली आहे.
खासदार फ्रान्सिस सार्दिन हे बेधडक विधाने करण्यात प्रसिद्ध आहेत. यापूर्वी देखील त्यांनी गिरीश चोडणकर यांना टार्गेट केले होते. अध्यक्षपदावरून चोडणकर यांना हटविण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र, त्यांच्या या मागणीला काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दाद दिली नव्हती उलट श्री. चोडणकर यांनाच अध्यक्षपदी कायम ठेवले. त्यानंतर खासदार सार्दिन हे गप्प पडले होते. मात्र, काल त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात त्यांनी पुन्हा एकदा गिरीश चोडणकर यांच्याबद्दल अपशब्द काढले आहेत.
काल हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तृळात त्याचे पडसाद उमटले. काँग्रेस पक्षात शिस्त नसल्याने असे प्रकार घडतात, अशा प्रतिक्रिया उमटल्या. विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच प्रदेशाध्यक्ष श्री. चोडणकर यांच्यावर पक्षांतर्गत टीका झाल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे.
दरम्यान, खासदार सार्दिन यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दर्शविला. मात्र, काल व्हायरल झालेला व्हिडीओ जुना असल्याचे सांगण्यात आले.
खासदार सार्दिन यांच्या खंदय़ा समर्थक असलेल्या एथल लोबो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने खासदार सार्दिन हे नाराज झाल्याने त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. एथल लोबो यांनी फातोर्डा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविण्याची तयार चालविली होती. मात्र, काँग्रेस पक्षाची गोवा फॉरवर्डकडे युतीची बोलणी सुरू असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने एथल लोबो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. खासदार सार्दिन हे गोवा फॉरवर्डशी युती करण्यास कोणत्याही परिस्थितीत राजी नव्हते. तर गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव हे युतीची बोलणी करू लागल्याने खासदार सार्दिन यांनी गिरीश चोडणकर यांच्याबद्दल अपशब्द काढले.