कलखांब येथील मंदिरात चोरी
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या काही महिन्यांमध्ये चोरटय़ांकडून ग्रामीण भागातील मंदिरांना लक्ष्य करण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. कलखांब येथील ब्रम्हलिंग मंदिरातील चांदीचा मुखवटा चोरटय़ांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मारिहाळ पोलीस स्थानकात फिर्याद नोंदविण्यात आली आहे.
दसरोत्सवानिमित्त ब्रम्हलिंग मंदिरामध्ये पूजा, अर्चा करण्यात येते. त्यामुळे मंदिरामध्ये चांदीचा मुखवटा ठेवून पूजा केली जाते. दररोज याची पूजा करण्यात येते. मात्र सोमवारी चोरटय़ांनी पहाटेच्यावेळी हा मुखवटा लांबविल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी मंदिराचे पुजारी मारुती रेवणसिध्द पुजेरी (रा. कणबर्गी) यांनी मारिहाळ पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
मागील काही महिन्यांपासून ग्रामीण भागांतील मंदिरांमध्ये चोरीच्या घटना वाढल्या आहेत. येळ्ळूर येथील चांगळेश्वरी मंदिर, लक्ष्मी मंदिर, जोतिबा मंदिर याठिकाणी चोऱया घडल्या आहेत. याचबरोबर इतर ठिकाणीही चोऱया झाल्या आहेत. त्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे.