आळसंद / वार्ताहर
गेल्या पंधरा दिवसापासून आळसंद परिसरात चोरट्यानी धुमाकूळ घातला आहे. आळसंद परिसरातील अनेक गावे सधन बनू लागली आहेत. गेल्या काही दिवसापासून अनेक ठिकाणी चोरीच्या घटना समोर येत आहे. याला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेने गावोगावी गस्त घालण्याचे आव्हान नागरिकांना केले आहे. याचे सर्वत्र काटेकोरपणे पालन केले जात आहे. अनेक घरातील तरुण ,युवक यामध्ये अग्रेसर सहभाग घेऊन गावाचे संरक्षण करताना दिसत आहेत. नागरिकांच्यामध्ये काही भितीचे वातावरण पसरले आहे.
त्यामुळे गस्त घालणारी मंडळी देखील घाबरून जात आहे. त्यामुळे विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आळसंदमध्ये मागील चार ते पाच दिवसापासून आळसंद बीटाचे हवालदार मोहन चव्हाण यांच्या मदतीने आळसंद परिसरातील संरक्षणासाठी राष्ट्रवादी पदवीधर संघ यांनी कंबर कसली आहे.
मागील काही वर्षांपूर्वी अशाच चोरी आळसंद परिसरात झाल्या होत्या त्यावेळी पण राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अजित जाधव यांनी आपल्या राष्ट्रवादी पक्षातील युवक कार्यकर्ते एकत्र गस्त घातली होते, त्यामुळे सर्व परिसरातून लोकांनी कौतुक केले होते. गेल्या चार ते पाच दिवसापासून राष्ट्रवादी सांगली जिल्ह्याचे कार्याध्यक्ष अजित जाधव यांच्याबरोबर कार्यकर्त्यांनी गावागावात फेरफटका मारून गस्त वाढवले आहेत, चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता फक्त आपल्या गावासाठी ही गस्त मर्यादित न ठेवता परिसरातील वाझर, कंळबी,पंचलिगनगर, कमळापूर, तांदळगाव, भाळवणी, आळसंद, बलवडी आदी गावासह वाड्या-वस्त्यांवर जोरदार यंत्रणा राबवली जात आहे, स्वतःची चारचाकी गाडी, काट्या व संरक्षणाची साधने त्याच्याबरोबर विटा पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांना घेऊन जोमाने गस्त सुरू ठेवले आहेत,
रात्री अकरा वाजल्यापासून ते पहाटे पर्यंत ही गाडी परिसरातील गावागावांमध्ये फिरत आहे. कोणी संशयास्पद आढळल्यास त्याची विचारपूस करून अनेकांना त्यांची माहिती दिली जात आहे.या उपक्रमांमुळे नागरिकांना स्वस्त झोप लागू लागली आहे, नेहमीच चर्चेत राहणारा हा राष्ट्रवादी पक्ष आता थेट चोरांचा त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी व समाजहिताचे चांगले काम युवकांमार्फत करू लागल्याने अनेक जण कौतुक करू लागले आहेत.
या पथकात विटा पोलीस ठाण्याचे कर्मचारी हवलदार मोहन चव्हाण,अर्जुन बोबडे, विक्रम गायकवाड(दादा), अरविंद संकपाळ, बाबुराव खरमाटे,गणेश कोळी ,कार्यकर्ते सुनिल जाधव, तेजस मुळीक सुनील घुंग,साहिल माळी इत्यादी सहभागी आहेत.