उद्यमबाग पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
उद्यमबाग येथील एका कारखान्यात चोरी केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी चौघा जणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मंगळवार दि. 8 फेब्रुवारी रोजी उद्यमबाग येथील यशोदा इंडस्ट्रीजमध्ये चोरीची घटना घडली होती. चोरटय़ांनी सुमारे 50 हजार रुपयांचे साहित्य पळविले होते. याप्रकरणी उद्यमबाग झोपडपट्टीतील अट्टल गुन्हेगारांना उद्यमबागचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे व त्यांच्या सहकाऱयांनी अटक केली आहे.
रामाप्पा हुल्याप्पा करकाळे, मारुती हुल्याप्पा करकाळे (दोघेही रा. उद्यमबाग, झोपडपट्टी), अमर सिद्धाप्पा बदरवाडी (रा. हावळनगर, मच्छे), सुनील बसाप्पा तोटगी (रा. राणी चन्नम्मानगर, सेकंड स्टेज) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याजवळून चोरीचे मशीन चेक, मशीन सेंटर, जॉब, वेस्ट बोरींग असा सुमारे 30 हजाराहून अधिक रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
25 गुन्हय़ांमध्ये आरोपी
अटक करण्यात आलेले चौघेजण पोलिसांच्या काळय़ा यादीतील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर 25 हून अधिक चोरीचे गुन्हे दाखल झाले असून ही सर्व प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. जामिनावर सुटका झाल्यानंतर हे तरुण पुन्हा चोरी करतात. उद्यमबाग परिसरातील कारखानदारांची डोकेदुखी ठरलेल्या या चौकडीला पोलीस निरीक्षक धीरज शिंदे व त्यांच्या सहकाऱयांनी अटक केली आहे.