उद्यमबाग पोलिसांची कारवाई, 70 ग्रॅम दागिने जप्त
प्रतिनिधी /बेळगाव
राणी चन्नम्मानगर येथील चोरीच्या घटनेनंतर केवळ दोन दिवसांत दोघा जणांना अटक करून उद्यमबाग पोलिसांनी साडेतीन लाख रुपयांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक धीरज शिंदे व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
सिद्धार्थ प्रकाश गुरव (वय 19, रा. राणाप्रताप रोड-टिळकवाडी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी अटक केली आहे. 13 ऑगस्ट रोजी सुधाकर संतराम वाघमोरे यांनी येथील उद्यमबाग पोलीस स्थानकात चोरीसंबंधी फिर्याद दिली होती.
पोलीस निरीक्षक धीरज शिंदे, एम. बी. अडगली, आय. एस. पाटील, जे. एफ. हादीमनी, इराण्णा चवलगी, शिवकुमार कर्की, अन्नपूर्णा कांबळे व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी 22.25 ग्रॅमचा सोन्याचा हार, 8 ग्रॅमची अंगठी, 15 ग्रॅम मंगळसुत्र, 5 ग्रॅमची कर्णफुले, 20 ग्रॅमच्या पाटल्या असे 70.25 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
अल्पवयीन मुलाच्या मदतीने टिळकवाडी येथील तरुणाने चोरी केली होती. चोरीचे दागिने विकून पैसे देण्याचेही ठरले होते. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.