मार्केट पोलिसांची कारवाई : मोबाईल, संगणकासह 64 हजारांचा ऐवज जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
चोरी प्रकरणी एका नेपाळी तरुणाला अटक करण्यात आली आहे. मार्केट पोलिसांनी गुरुवारी ही कारवाई केली असून तो तरुण चायनिज कुक असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्याजवळून 64 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सुरज रामबहाद्दुर दमय (वय 24, मूळचा रा. बहुनिया, परती, लोहागड-नेपाळ, सध्या रा. धारवाड रोड, बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याजवळून दोन मोबाईल व एक सीपीयु, एक मॉनिटर असा सुमारे 64 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
मार्केटचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जे. एम. मगदूम, हवालदार एस. टी. तेली, वाय. एच. कोच्चरगी, एस. एम. करलिंगण्णावर, एस. एन. पात्रोट व त्यांच्या सहकाऱयांनी गुरुवारी सुरजला अटक केली आहे.
16 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री कपिलेश्वर कॉलनी येथील कलाआर्टस्मध्ये चोरीचा प्रकार घडला होता. दुसऱया दिवशी 17 फेब्रुवारी रोजी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला होता. मोबाईल, सीपीयु, मॉनिटर चोरल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून सुरजला अटक केली आहे.
चायनिज कुकची करामत
चोरी प्रकरणी गुरुवारी मार्केट पोलिसांनी अटक केलेला सुरज दमय हा व्यवसायाने कुक आहे. तो चायनिज पदार्थ तयार करतो. त्याचे वडील गुरखा आहेत. कपिलेश्वर कॉलनी परिसरात झालेल्या चोरी प्रकरणी तो पोलिसांच्या जाळय़ात अडकला आहे. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.