कॅम्प पोलिसांची कारवाई : 1 लाख 10 हजार रुपये जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
झीज झालेल्या नोटा मोजताना चोरी केल्याच्या आरोपावरून हुनशीकट्टी (ता. बैलहोंगल) येथील एका युवकाला कॅम्प पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. त्याच्या जवळून 1 लाख 10 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
आज्जाप्पा शिवाप्पा मदलूर (वय 30, रा. हुनशीकट्टी) असे त्या युवकाचे नाव आहे. कॅम्पचे पोलीस निरीक्षक संतोषकुमार व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली. अटकेची कारवाई पूर्ण करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एसबीआयच्या खानापूर येथील शाखेत नोटा मोजताना ही घटना घडली आहे. आज्जाप्पा हा खासगी कंपनीतील कामगार आहे. झीज झालेल्या नोटा मोजून बँकेमार्फत रिझर्व्ह बँकेला परत पाठविण्याच्या प्रक्रियेच्या वेळी त्याने नोटा चोरल्याची तक्रार कॅम्प पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली होती.
आठवडाभरापूर्वी या संबंधी एफआयआर दाखल झाला होता. पोलिसांनी आज्जाप्पाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.