एपीएमसी पोलिसांची कारवाई, पावणे चार लाखाचे दागिने जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
चोरीप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी सदाशिवनगर येथील एका तरुणाला अटक केली आहे. शनिवारी ही कारवाई करण्यात आली असून त्याच्याजवळून पावणे चार लाख रुपये किमतीचे 75 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
अर्जुन सोमाप्पा लमाणी (वय 33, मूळचा रा. आलदकट्टी, के. वाय. तांडा-बडली, ता. सौंदत्ती, सध्या रा. सदाशिवनगर) असे त्याचे नाव आहे. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री, पोलीस उपनिरीक्षक त्रिवेणी नाटिकार व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली.
सदाशिवनगर येथील सविता व्यंकटेश लमाणी यांच्या घरी चोरीची घटना घडली होती. 13 जून 2022 रोजी यासंबंधी एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी अटक केलेला अर्जुन हा सविता यांचा नातेवाईक आहे. सविता यांनी ट्रंकमध्ये ठेवलेले दागिने चोरीस गेले होते.
माहीतगार व्यक्तीकडून ही चोरी झाल्याच्या संशयाने पोलिसांनी तपास हाती घेतला. अर्जुनच्या ताब्यातून 13 ग्रॅमचा एक नेकलेस, 61 ग्रॅमचे एक गंठण असे 75 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलीस उपनिरीक्षक मृत्यूंजय मठद, बी. के. मिटगार, दीपक सागर, सोमाप्पा करलिंगण्णावर, नामदेव लमाणी, केंपान्ना दोडमनी, गोविंद पुजारी आदींचाही तपास पथकात समावेश आहे.