प्रतिनिधी/ सातारा
लॉकडाऊन कालावधीत महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला गुटखा चढय़ा दराने विक्री करणाऱया युवकास स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय शंकर भोसले रा. वृंदावन वाटिका, गोडोली, सातारा असे अटक केलेल्या युवकाचे नाव असून त्याच्या ताब्यातील दुचाकी व गुटखा असा एकूण 51 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार दि. 22 रोजी साताऱयातील अजंठा चौक, पांचाली हॉटेल समोर, श्री साई पानशॉपच्या आडोशाला एक युवक बेकायदेशीरपणे अवैधरित्या गुटखा विक्री असल्याची बातमी मिळाली. पाटील यांनी त्यांच्या तपास पथकास कारवाई करण्याच्या सूचना केल्या.
त्यानुसार तपास पथकाने साई पानशॉपच्या आडोशाला छापा टाकला असता तिथे अजय भोसले आढळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्या दुचाकी व दुचाकीच्या डिकीत गुटखा मिळून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने तो विक्रीसाठी आणला असल्याची कबुली दिल्यावर मुद्देमालासह त्याला ताब्यात घेवून त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या सुचनेनुसार सहाय्यक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, ज्योतीराम बर्गे, हवालदार विनोद गायकवाड, पोलीस नाईक योगेश पोळ, नितीन भोसले, प्रविण कडव, केतन शिंदे यांनी केली.