चिपळूण महावितरण करणार संबंधित मालकाला बिलांच्या सरासरीनुसार दंड
प्रतिनिधी / चिपळूण
शहरातील उक्ताड येथील मरियम अपार्टमेंट या इमारतीमधील बारा सदनिकांना चोरून वीजपुरवठा केल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे महावितरण आता संबंधित मालकाला बिलांच्या सरासरीनुसार दंड आकारणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
या इमारतीला चोरून वीजपुरवठा सुरू असल्याची तक्रार तेथील रहिवाशी बिल्कीस नईम हळदे यांनी चार दिवसांपूर्वी चिपळूण महावितरण कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे. इमारतीमधील रहिवाशांना मीटर दिली गेली नसल्याने व विजेच्या वायर उघडपणे पार्किंगमध्ये असल्याने लहान मुले व रहिवाशांना धोका निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्यानुसार महावितरणचे कनिष्ठ अभियंता आर. ए. मदने यांनी या अपार्टमेंटला भेट देऊन पाहणी केली व तेथील परिस्थितीचा पंचनामा केला आहे. त्यानुसार आता हा प्रकार कधीपासून सुरू आहे तेव्हापासून किती वीजवापर झाला असेल याची आकडेमोड सुरू आहे. ती पूर्ण झाल्यावर संबंधित मालकावर दंडाची कारवाई केली जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मदने यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना दिली.