वाईल्डरनेस्ट नेचर रिसॉर्टचा भारतातील पहिलाच प्रकल्प : वन्यप्रेमींना मिळणार पश्चिम घाट पाहण्याचा विशेष अनुभव
प्रतिनिधी /पणजी
वाइल्डर नेस्ट नेचर रिसॉर्ट, चोर्ला घाट येथे एक अनोखा अनुभव म्हणून संकल्पना, डिझाइन आणि कार्यवाहित आणलेल्या स्लोप टेनचे उद्घाटन गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्याहस्ते करण्यात आले.
स्वप्नगंधा रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन नितीन धोंड यांच्या संकल्पनेतून सत्यात उतरलेला हा प्रकल्प म्हणजे गर्द वनराईच्या सानिध्यातून भारतातील पश्चिम घाट पाहण्याचा विशेष अनुभव देणारा आपल्या पद्धतीचा देशातील पहिलाच प्रकल्प ठरला आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सौ. विजयादेवी राणे तसेच लोकमान्य सहकारी संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर व राजेश शिवदास वेरेकर आदींची उपस्थिती होती. त्याशिवाय या प्रकल्पात उल्लेखनीय योगदान देणारे पांडुरंग धोंड, संजय कुलकर्णी, अभय तेंडुलकर आदी मान्यवरही उपस्थित होते.
हे मॉडेल गोव्यासह देशभरातील जंगलात प्रवेशाच्या समस्या सोडवितानाच पर्यावरणीय पर्यटकांसाठीही गर्द वनराईतील दृश्ये उपलब्ध करून देण्यात मदतगार ठरणार आहे, असे मत कॅप्टन धोंड यांनी व्यक्त केले. हा प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करण्यासाठी डिझाईन, लॉजिस्टिक्स आणि मेकॅनिकल टीमचे कठोर परिश्रम आणि धैर्याबद्दल धोंड यांनी आभार मानले. या प्रकल्पासाठी योगदान देणाऱया सर्व प्रमुखांचा राणे यांच्याहस्ते शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
वाइल्डर नेस्ट व्यवस्थापनाचे राणेंकडून कौतुक
या प्रसंगी प्रमुख पाहुणे श्री. राणे यांनी डोंगराळ प्रदेशावर आधारित पर्यटनासाठी दीर्घकालीन दृष्टीकोन असण्यावर भर दिला आणि पश्चिम घाटातील चोर्ला घाट परिसरात वाईल्डर नेस्ट आणि स्वप्नगंधा हे ट्विन रिसॉर्ट्स स्थापन केल्याबद्दल व्यवस्थापनाचे कौतुक केले.
वरिष्ठ संचालक बाबा धोंड यांच्यासमवेत अनुभव घेण्यासाठी त्यांनी दोनदा टेनचा प्रवास केला आणि त्यांच्या लँडस्केपमधील प्रवासातील अनुभव उपस्थितांना कथन केले.
किरण ठाकूर यांनी आभारप्रदर्शन केले. त्यावेळी बोलताना त्यांनी, या प्रदेशातील सर्व सामाजिक कार्यांसाठी दिलेला उत्स्फूर्त पाठिंबा आणि मार्गदर्शनाबद्दल आभार मानले. तसेच या कठीण काळात हा प्रकल्प कार्यान्वित केल्याबद्दल रचना इन्फोटेकच्या टीमचे कौतुक केले. या संकल्पनेचा वापर अतीदुर्गम किंवा देशभरातील संवेदनशील वन अधिवासात असलेल्या भागात केला जाऊ शकतो, असेही ठाकूर यांनी पुढे सांगितले.
स्वदेशी डिझाइनचा हा भारतातील पहिला प्रकल्प
स्वदेशी डिझाइन असलेला भारतातील हा पहिला स्लोप टेन प्रकल्प, रचना इन्फोटेक बेळगाव यांनी बांधून कार्यान्वित केला आहे. यावेळी रचना इन्फोटेकचे संचालक रमण कामत, स्वप्नगंधा रिसॉर्ट्सचे संचालक सुधीर नाईक, पर्यावरणशास्त्रज्ञ आणि स्वप्नगंधा रिसॉर्ट्सचे संचालक निर्मल कुलकर्णी आणि मुख्य कंत्राटदार गोविंद सरकार उपस्थित होते.
या स्लोप टेनने घनदाट जंगलातून अंदाजे 110 मीटरचे अंतर कापले आहे आणि एका बाजूला भव्य वजरा सकला धबधबा आणि दुसरीकडे म्हादई वन्यजीव अभयारण्यचे 360 अंश दृश्य प्रदान करते. हे जंगल एका महत्त्वाच्या पक्षी क्षेत्राचा भाग आहे. स्लेंडर लॉरिस आणि ग्रेट पाईड हॉर्नबिल सारखे कमी ज्ञात वन्यजीव देखील या अनोख्या लँडस्केपचा भाग आहेत. पहाटे आणि संध्याकाळच्या वेळी हे दृष्य असामान्य असा अनुभव देणारे आहे. सुंदर आणि विलक्षण असा सूर्यास्त, आणि उतारावरील टेनच्या सर्वोच्च बिंदूवरून पणजी शहर आणि कल्पित असा अरबी समुद्र पाहता येतो.