चार तास वाहतूक ठप्प : छोटय़ा वाहनांसाठी एका बाजूने रस्ता केला मोकळा अवजड वाहतुकीला बंदी असूनही वाहतूक सुरूच : जिल्हाधिकाऱयांचा आदेशाला फाटा
प्रतिनिधी / वाळपई
गोवा बेळगाव दरम्यान चोर्ला घाट परिसरातून अवजड प्रकारच्या वाहतुकीला जिल्हाधिकाऱयांनी बंदी घातली असतानाही बिनधास्तपणे वाहतूक सुरू आहे. याचा फटका या मार्गावरील वाहतुकीला बसला. 14 चाकी अवजड ट्रक रस्त्याच्या मधोमध फसल्याने या मार्गावरील सुमारे चार तास वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर एका बाजूने रस्ता मोकळा करून चार चाकी वाहने जाण्यासाठी व्यवस्था केली. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली. मात्र मोठय़ा गाडय़ांची वाहतूक संध्याकाळी उशिरापर्यंत खोळंबलेली होती. यामुळे अवजड वाहनांची लांबचलांब रांग लागली होती.
याबाबतची माहिती अशी की, गोवा बेळगाव दरम्यानच्या चोर्ला भागातून जिल्हाधिकाऱयांनी अवजड प्रकारच्या वाहतुकीला बंदी घातली आहे. हा आदेश अजूनही कायम आहे. असे असतानाही गेल्या अनेक महिन्यांपासून या भागातून अवजड प्रकारची वाहतूक सर्रासपणे सुरू आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठय़ा प्रमाणात समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
संबंधित खात्याची यंत्रणा याबाबत पूर्णपणे निष्काळजीपणा करीत असून यामुळे वारंवार या महामार्गावर अपघाताला सामोरे जावे लागत आहे. यामुळे सातत्याने वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या चार दिवसांपासून या भागात मोठय़ा प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यातच गुरुवारी मध्यरात्री 14 चाकी अवजड ट्रक रस्त्याच्या मध्येच फसल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे सकाळी नऊ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. शेवटी सकाळी एका बाजूने काही प्रमाणात रस्ता मोकळा करण्यात आल्यानंतर चार चाकी वाहनांना जाण्याची व्यवस्था केली. मात्र अवजड व मोठी वाहने रात्रीपासून फसलेली आहेत. दोन्ही बाजूने अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
अन्य वाहन चालकांसमोर समस्या
गुरुवारी फसलेला ट्रक शुक्रवारी संध्याकाळपर्यंत हलविण्याचा प्रयत्न केला; मात्र हा प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी ठरला आहे. यामुळे सदर महामार्गावरून वाहतूक करणाऱया वाहन चालकांना मोठय़ा समस्येला सामोरे जावे लागत आहे. ट्रकमध्ये बिघाड झाल्यामुळे हा ट्रक रस्त्याच्या मधोमध फसला. या ट्रकात मोठय़ा प्रमाणात सामान भरलेले असल्याने सहजासहजी सदर ट्रक घटनास्थळावरून हलविणे कठीण बनले आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अवजड ट्रकांच्या मोठमोठय़ा रांगा लागलेला आहेत. यामुळे सदर ट्रक चालकांची मोठय़ा प्रमाणात गोची झालेली आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे, तो भाग पूर्णपणे जंगलभाग आहे. या ठिकाणी खाण्यासाठी कोणताही पदार्थ मिळणे अवघड आहे. यामुळे काही ट्रक चालकांचे मध्यरात्रीपासून हाल झाले आहेत.
जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाबाबत गांभीर्य नाही
गेल्या एक वर्षभरापासून या महामार्गावर अवजड प्रकारच्या वाहतुकीला उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांनी पूर्णपणे बंदी घातलेली आहे. या आदेशाची अद्यापही गांभीर्याने अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या मार्गावरून होणाऱया अवजड वाहतुकीवर संबंधित खात्याकडून कोणतीही कारवाई केलेली नाही. यामुळे जिल्हाधिकाऱयांचा आदेश फक्त कागदोपत्रीच शिल्लक राहिलेला आहे. पावसाळी हंगामात या आदेशाची कडक अंमलबजावणी न केल्यास मार्गावरून प्रवास करणाऱया सामान्य प्रवाशांना गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत.
अवजड वाहतूक बंदीचा आदेश पुन्हा जारी
उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांनी 1 जुलै ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत पुन्हा एकदा या महामार्गावरून अवजड प्रकारच्या वाहतुकीला बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश स्थानिक यंत्रणेला देण्यात आले आहेत. हा आदेश दोन दिवसांपूर्वीच जारी करण्यात आलेला आहे