महामार्गावर पुन्हा डांबरीकरणाला सुरुवात : 15 दिवस चालणार काम
प्रतिनिधी /वाळपई
गोवा ते बेळगाव या चोर्ला महामार्गाच्या दुरुस्तीला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. सोमवारपासून हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येत असून दि. 4 ते 11 मे याकालावधीत या मार्गावर अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे.
या महामार्गाची गोवा हद्दीमध्ये पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. यामुळे या रस्त्याचे जवळपास नऊ कोटी रुपये खर्च करून डांबरीकरण करण्यात येणार होते. मात्र ज्या कंत्राटदाराने सदर रस्त्याचे काम घेतले होते त्याने काम करताना निष्काळजीपणा केला होता. त्यामुळे रस्त्याचे काम निकृष्ट बनले होते. कंत्राटदाराच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या महामार्ग व्यवस्थापनाच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केल्यामुळे गोवा सरकारने दोन अधिकाऱयांचे निलंबन केले आहे.
पंधरा दिवस होणार डांबरीकरण
येत्या महिन्याभरात पावसाला सुरुवात होणार आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सदर रस्त्याच्या डांबरीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. या रस्त्याचे पूर्णपणे डांबरीकरण करण्यासाठी किमान पंधरा दिवसांचा अवधी लागणार आहे. ज्या ठिकाणी रस्ता खराब झालेला आहे, त्या ठिकाणी दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
कडक कारवाइ&
सरकारी आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून या मार्गावर अवजड वाहतुकीस परवानगी देण्यात येणार नाही. जबरदस्तीने या महामार्गावर वाहतूक करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे या संदर्भात वाळपई वाहतूक पोलीस अधिकऱयांनी सांगितले आहे.