खनगाव बी. के. येथील घटनेने खळबळ, मारिहाळ पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी / बेळगाव
चोर समजून केलेल्या मारहाणीत मुचंडी (ता. बेळगाव) येथील एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. खनगाव बी. के. येथे शनिवारी रात्री ही घटना घडली असून परिसरात खळबळ माजली आहे. यासंबंधी मारिहाळ पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
आनंद मारुती कोलकार (वय 59) रा. मुचंडी असे त्या दुर्दैवी वृद्धाचे नाव आहे. आपल्या मित्रासमवेत ढाब्यावर जेवणाला जाऊन घरी परतताना ही घटना घडली असून आनंद यांची पत्नी महादेवी यांनी मारिहाळ पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. खनगाव बी. के. येथील बाळकृष्ण सन्नभरमा बिळकी व त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या मारहाणीत आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचे महादेवी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
घटनेची माहिती समजताच मारिहाळचे पोलीस निरीक्षक बी. एस. मंटूर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आनंद हे सागर कोरीशेट्टी यांच्याबरोबर बेळगाव-गोकाक रोडवरील शक्ती ढाब्यावर जेवणाला गेले होते. रात्रीचे जेवण आटोपून चालत येताना चोर समजून झालेल्या मारहाणीत ते गंभीर झाले. या घटनेची माहिती समजताच आनंद यांचे कुटुंबीयही घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी त्यांनाही शिवीगाळ करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. गंभीर जखमी अवस्थेतील आनंद यांना रविवारी पहाटे सिव्हिल हॉस्पिटलला हलवताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. सायंकाळी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. रविवारी रात्री अधिक माहिती मिळविण्यासाठी मारिहाळ पोलिसांशी संपर्क साधला असता तपास सुरू आहे, लवकरच या प्रकरणाचा छडा लावण्यात येईल, असे अधिकाऱयांनी सांगितले. पोलीस निरीक्षक बी. एस. मंटूर पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, रविवारी रात्री आनंद यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.