ओमिक्रॉन सक्रीय रुग्णांची संख्या पाच : फोंडा पोलिसस्थानकात पाचजण बाधित : कार्डिलिया जहाजातील 66 जण रुग्ण
प्रतिनिधी /पणजी
रविवारच्या तुलनेत काल सोमवारीही कोरोनाबाधितांच्या संख्येत तब्बल 631 अशी मोठी वाढ झाली असून सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा 2000 चा पल्ला पार करीत 2240 वर जाऊन पोहोचला आहे. त्यातील 626 जणांना होम आयसोलेशन दिले असून 5 जणांना हॉस्पिटलात भरती केले तर 3 जणांना तेथून घरी पाठवले. गोव्यात ‘ओमिक्रॉन’चे 4 नवीन रुग्ण आढळले असून त्यांचा पुणे येथे पाठवलेल्या नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यातील 1 रुग्ण स्थानिक असून त्याने कुठेही प्रवास केलेला नसल्याचे चौकशीतून समोर आले आहे. फोंडा पोलिसस्थानकात 5 पोलीस बाधित झाले आहेत.
मुंबईतून गोव्यात आलेल्या कॉर्डेलिया जहाजामधील 2000 प्रवाशांची कोरोना चाचणी घेतली असता त्यातील 66 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. त्याची माहिती संबंधित जिल्हाधिकारी व एमपीटी बंद प्रमुखांना दिल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी नमूद केले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री व इतर संबंधितांशी चर्चा करून पुढील कृती ठरवण्यात येणार असल्याचे राणे यांनी सांगितले. यापूर्वी 1 रुग्ण सापडला होता. त्यामुळे ओमिक्रॉनच्या गोव्यातील एकूण रुग्णांची संख्या आता 5 झाली आहे.
कोरोना संसर्गाचा दर 23 टक्के
कोरोना संसर्गाचा दर 23 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. दिवसभरात 62 जण बरे झाले असून बळी गेले नसल्यामुळे मृतांचा आकडा स्थिर म्हणजे 3523 एवढा राहिला आहे. पणजी आरोग्य केंद्रातील रुग्णांची संख्या 300 च्या उंबरठय़ावर असून 299 झाली आहे. म्हापसा कासावली, कुठाळी, कांदोळी व पर्वरी आरोग्य केंद्रातील रुग्णसंख्येने 100 चा पल्ला पार केला असून मडगावची रुग्णसंख्या 271 वर पोहोचली आहे. शिवोली आरोग्य केंद्राची रुग्णसंख्या 96 असून शतकाच्या उंबरठय़ावर आहे. आतापर्यंत मिळून एकूण 182201 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 176438 जणांना कोरोनातून मुक्ती मिळाली आहे.
शहरांमध्ये झपाटय़ाने वाढतो संसर्ग
शहरी भागात मोठय़ा प्रमाणात रुग्ण वाढल्याचे दिसत असून ग्रामीण भागात ते प्रमाण कमी असल्याचे समोर आले आहे. पणजी, म्हापसा, कासावली, कुठ्ठाळी, कांदोळी, पर्वरी व मडगाव येथील रुग्णसंख्या शंभर ते तीनशेपर्यंत आहे. राज्यात ज्या अनेक केंद्रामध्ये बाधितांचा आकडा शून्यापर्यंत आला होता, तिथेही आता दहाच्यावर बाधित प्रतिदिन सापडू लागले आहेत.
आरोग्य केंद्रनिहाय रुग्णसंख्या
- डिचोली 20
- सांखळी 20
- पेडणे 35
- वाळपई 16
- म्हापसा 136
- पणजी 299
- हळदोणा 45
- बेतकी 14
- कांदोळी 111
- कासारवर्णे 3
- कोलवाळ 24
- खोर्ली 37
- चिंबल 87
- शिवोली 96
- पर्वरी 153
- मये 9
- कुडचडे 38
- काणकोण 25
- मडगाव 271
- वास्को 70
- बाळ्ळी 42
- कासावली 177
- चिंचणी 71
- कुठ्ठाळी 114
- कुडतरी 46
- लोटली 82
- मडकई 5
- केपे 32
- सांगे 15
- शिरोडा 9
- धारबांदोडा 8
- फोंडा 82
- नावेली 44
- 3 जानेवारीपर्यंतचे एकूण रुग्ण 182201
- बरे झाले रुग्ण 176438
- सक्रिय कोरोना रुग्ण 2240
- 3 जानेवारीचे नवीन रुग्ण 631
- बरे झालेले रुग्ण 62
- कोरोना बळी 00
- आतापर्यंतचे एकूण बळी 3523