एकूण रुग्णसंख्या 8 लाख 21 हजारांवर : दिवसभरात 519 बळी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून शुक्रवारपर्यंत मागील चोवीस तासात तब्बल 27 हजार 114 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच शनिवारी मृतांचा आकडाही 519 ने वाढल्याने देशातील आतापर्यंतच्या मृतांची संख्या 22 हजार 123 वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 20 हजारांच्या जवळपास असून आतापर्यंत 5 लाख 15 हजार 386 रुग्णांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशात गेल्या चार दिवसात एक लाख नव्या रुग्णांची भर पडल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. सध्या देशात दर तासाला एक हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. शनिवारी देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8 लाख 20 हजार 916 इतकी झाली. गेल्या 24 तासात देशात 27 हजार 114 नवीन रुग्ण सापडले असून एका दिवसातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.
चार दिवसात एक लाखाने वाढ
गेल्या आठ दिवसांपासून देशात दिवसाला 20 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. तसेच चाचण्यांमध्ये वाढ केल्यामुळे गेल्या चार दिवसांत देशात एक लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर सातत्याने विविध राज्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. सध्या देशात 2 लाख 83 हजार 407 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 5 लाख 15 हजार 386 रुग्ण बरे झाले आहेत.
राज्यांची स्थिती महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि दिल्लीत मोठय़ा प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत. महाराष्ट्रात एकूण रुग्णसंख्या एक-दोन दिवसात अडीच लाखांचा टप्पा गाठण्याची चिन्हे आहेत. शनिवारी महाराष्ट्रात 7,862 नवे रुग्ण सापडले असून 226 जणांचा बळी गेल्याची नोंद ‘आरोग्य सेतू’ ऍपवर झाली आहे. तामिळनाडूत साडेतीन हजारांहून अधिक रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या 1 लाख 30 हजार 261 झाली आहे. दिल्लीतही दोन हजार नवे रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णसंख्या 1 लाख 9 हजार 140 झाली आहे.