मतदार नावे कमी करण्याबाबत सभागृहाचा निर्णय
निवडणूक विभागानेही केले ऑनलाईन मार्गदर्शन
तब्बल 810 नावे वगळण्याची सुरू आहे कार्यवाही
प्रतिनिधी / मालवण:
मालवण शहरातील तब्बल 800 नावे मतदारयादीतून कामी करण्याबाबत पालिका प्रशासनाकडून ठराव होण्यासाठी तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाने सादर केलेल्या पत्रावर चौकशीनंतरच पालिकेचा ठराव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सध्यातरी निवडणूक विभागाकडून सादर करण्यात आलेल्या यादीची तपासणी नगरसेवकांकडून करण्यात येणार आहे. सदरची तपासणी झाल्यानंतर पालिका प्रशासनाकडून आवश्यक असणारा ठराव सादर केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मालवण शहरातील तब्बल 810 मतदारांचे फोटो मतदार यादीत नसल्याने ही नावे वगळण्याची कार्यवाही निवडणूक विभागाने सुरू केली आहे. यासाठी नगरपालिकेकडून ही नावे वगळण्याचा ठराव देण्याची सूचना निवडणूक विभागाने केली होती. मात्र, याबाबत पालिका प्रशासनाकडून कोणताही ठराव देण्यात आलेला नव्हता. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत हा विषय ठेवण्यात आला होता. यावेळी सर्वच नगरसेविकांनी नावे कमी करण्यास विरोध दर्शविला. केंद्रस्तरीय अधिकारी त्यांच्या कार्यालयातच उपलब्ध होत नसल्याने फोटो देण्यासाठी अडचणी येत असल्याचे नगरसेवकांनी सांगितले. वगळण्यात येणारी नावे आमच्याकडे सादर करा आणि नतंरच पालिका प्रशासनाकडून ठराव उपलब्ध होईल, अशी भूमिका घेण्यात आली.
थेट नावे वगळण्यास नगरसेवकांचा विरोध
निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 या अहर्ता दिनांकावर आधारित विधानसभा मतदारयादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमांतर्गत 17 नोव्हेंबरला प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून 15 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीत 5, 6, 12 व 13 डिसेंबरला मतदार नोंदणी संबंधाने विशेष मोहीम राबविण्यात आली. विशेष मोहिमेसाठी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहिले होते. यानंतर मतदारयादीत फोटो नसलेल्या मतदारांना वगळण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. हरकतींचा कार्यक्रम संपल्यानंतर आता निवडणूक विभागाने पुढील कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान, पालिकेच्या ऑनलाईन सभेसाठीही निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित राहून मार्गदर्शन केले होते. तरीही नगरसेवकांनी थेट नावे वगळण्याचा ठराव घेण्यास विरोध दर्शविला.
नगरपालिकेची भूमिका महत्वाची
मालवण नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक ऑक्टोबर 2021 मध्ये होत आहे. यावेळी नगरसेवकांतून नगराध्यक्ष निवड होणार असल्याने आणि बहुप्रभागीय पद्धत बंद करण्यात आल्याने एक-एक मत उमेदवारांसाठी महत्वाचे ठरणार आहे. असे असताना एकाच वेळी जर शहरातील 810 मते यादीतून वगळण्यात आली, तर इच्छुकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे आता या मतदारांचा शोध घेऊन त्यांचे फोटो निवडणूक कार्यालयाकडे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पालिकेने ही नावे वगळण्यात यावीत, असा ठराव दिला. तर नावे वगळली जाणार आहेत आणि वगळण्यात येऊ नयेत, असा ठराव दिला. तर मतदारांचे फोटो उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पालिकेवर येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या भूमिकेवर 810 मतदारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.