बसवनकोळळ जलशुध्दिकरण प्रकल्पातील स्वयंचलित यंत्रणा धुळ खात पडून
प्रतिनिधी/ बेळगाव
बसवनकोळळ जलशुध्दिकरण प्रकल्पाचे कामकाज अत्याधूनिक पध्दतीने करण्यासाठी स्वयंचलीत यंत्रणा बसविण्यात आली आहे. पण साडे तीन कोटी खर्ची घालण्यात आलेली यंत्रणा बंद असल्याने महापालिकेकडून पाहणी करून चौकशी करण्यात आली होती. मात्र ही यंत्रणा कार्यान्वित करण्याच्यादृष्टीने कोणतीच कारवाई झाली नाही. यामुळे महापालिका प्रशासन आणि पाणी पुरवठा मंडळ सपशेल अपयशी ठरले असल्याचा आरोप होत आहे.
शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी कोटयावधी निधीचा खर्च करण्यात येत आहे. पण कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप महापालिका सभागृहात करण्यात आला होता. बसवनकोळळ जलशुध्दिकरण प्रकल्पाच्या कामकाजासाठी स्वयंचलिक यंत्रोपकरणे (स्काडा सिस्टीम) बसविण्यात आली आहे. याकरिता 3कोटी 48 लाख रूपये स्वयंचलित यंत्रणा (स्काडा सिस्टीम) बसविण्यासाठी खर्च करण्यात आले होते.. पण ही यंत्रणा बंदच ठेवण्यात आली असल्याने याबाबत डॉ. दिनेश नाशीपुडी यांनी आक्षेप घेतला होता. तसेच मनपा सभागृहात याबाबत तक्रार करून चौकशी करण्याची मागणी केली होती. यामुळे तत्कालीन महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यांनी पाणी पुरवठा मंडळ आणि मनपा अभियंत्यासमवेत पाहणी करून चौकशी केली होती. याबाबत कंत्राटदारावर कोणती कारवाई करण्यात आली याची माहिती देण्यात आली नाही. मात्र सदर कंत्राटदाराला सुचना देवून स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित करण्याचा आदेश देण्यात आला होता. चौकशी करून व पाणी पुरवठा मंडळाच्या कंत्राटदाराला सुचना देवून दिड वर्ष उलटले पण स्वंयचलीत यंत्रणा अद्याप कार्यान्वित झाली नाही.
यंत्रणा बसवून दोन वर्षे झाली, पण याचा वापर करण्यात आला नाही. पण वापर करण्यापुर्वीच दुरूस्ती करण्याची वेळ आली आहे. पाणी पुरवठा मंडळाच्या कारभाराकडे महापालिका प्रशासन आणि पाणीपुरवठा मंडळाच्या वरीष्ट अधिकाऱयांचा कानाडोळा झाल्याने कंत्राटदाराचे फावले आहे. पाणी पुरवठा मंडळाच्या गैरभाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आल्याने गैरकारभार चव्हाटय़ावर येत आहेत. यामुळे जलशुध्दिकरण प्रकल्पाची चौकशी करण्यात आल्यानंतर कंत्राटदार आणि अधिकाऱयांवर कारवाई करण्याची गरज आहे. मात्र कारवाई दुरच राहिली, स्वयंचलिक यंत्रणा कार्यान्वित करण्याची तसदी पाणी पुरवठा मंडळ आणि महापालिका प्रशासनाने घेतली नाही. यामुळे चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱयांसह कंत्राटदारावर कारवाई करण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.