नगरसेविकेने लावलेल्या बोर्डाला स्थानिकांचा विरोध
प्रतिनिधी/ सातारा
करंजेत परदेशी चौक (सेनॉर चौक) नामांतराचा वाद चांगलाच पेटला आहे. स्थानिक नागरिकांनी या नामांतराला विरोध दर्शविला असून काही युवकांनी या बोर्डची नासधुस केली आहे. एका नगरसेविकेने आपल्या दिवंगत पतीचे नाव या चौकाला दिल्याने याला विरोध दर्शविला आहे. हे प्रकरण सध्या चांगलेच तापले असुन नागरिकांनी नगरपालिकेत येऊन याबाबतचे निवेदन ही दिले आहे.
या घटनेमुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. येथील मल्हार पेठ ते बसाप्पा पेठ व राधिका रोड यादरम्यानचा चौक हा सेनॉर चौक व परदेशी चौक या नावाने ओळखला जातो. पण दोन वर्षापुर्वी नगरपालिकेची परवानगी घेत या चौकाचे नाव बदलले असल्याचे सांगुन या नगरसेविकेने आपल्या दिवंगत पतीच्या नावाचा फलक या चौकात लावला होता. याला स्थानिक नागरिकांनी तिव्र विरोध दर्शविला.
याबाबतचे निवेदन ही सादर करण्यात आले असुन त्यामध्ये प्रभाग क्र. 9 मधील जुन्या परदेशी चौकास तेथील नागरिकांना विचारत न घेता कोणाचेही वैयक्तीक नाव देऊ नये, यामध्ये स्थानिक राजकीय फायद्याचा घाट घाटला जात असुन. चौकास नाव दिलेला व्यक्ती कोणी राष्ट्रपुरूष, किंवा स्वातंत्र्य सैनिक नाही. लोकशाहीची गळचेपी करून गुंडगीरीच्या जोरावर चौकास नाव देण्यात आले, आणि तसा प्रस्ताव मंजुर करण्यात आला.
या प्रस्तावास स्थानिक नागरिकांचा विरोध असुन तो रद्द करावा, गट नं 313/8 या गटातील संबंधित रस्त्यासाठी 16 गुंठे जागा परदेशी कुटुंबीयांची गेली असुन तसा सात-बारा आहे. संबंधित जागेचा त्यांना मोबदलाही मिळालेला नाही. चौकाच्या तीनशे ते चारशे मीटरमध्ये परदेशी कुटुंबियांची घरे असुन त्यांनाही याची कोणतीच कल्पना देण्यात आलेली नाही. त्या चौकात नगरपालिकेच्या परवानगीने गेली 22 वर्ष महाराना प्रताप मंडळाकडुन गणेशोत्सव साजरा केला जात असुन त्यामुळे या या चौकास महाराणा प्रताप चौक किंवा परदेशी चौक या नावाचा प्रस्ताव पालिकेने पुन्हा घ्यावा, असे न केल्या स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलने किंवा आत्मदहन करतील याला संबंधित नगरसेविकाच जबाबदार असेल असेही निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुखांना दिलेल्या या निवेदनात 38 जणांच्या सहय़ा आहेत.