प्रा. संध्या चौगुले यांची माहिती : 12 रोजी मान्यवरांच्या वितरण
प्रतिनिधी/ सातारा
हिरवाई संस्थेच्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा पांडुरंग चौगुले स्मृती पुरस्कार कैलास स्मशानभूमीत काम करणाऱया सेवकांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती हिरवाईच्या संस्थापिका प्रा. संध्या चौगुले यांनी दिली.
सध्या कोरोना महामारीच्या काळात जेथे रक्ताची नाती पोहोचू शकत नाहीत तेथे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या बाधित व्यक्तींचा अंत्यसंस्कार जीवाची बाजी लावून अत्यंत आत्मीयतेने, रक्तसिद्ध नात्याहूनही अधिक तळमळीने करीत असलेल्या कैलास स्मशानभूमीतील चंद्रकांत लक्ष्मण कुंभार, टेकाराम राजाराम शिर्के, अशोक संपतराव जाधव, सचिन बाबुराव सोनवणे, बाळू ज्ञानदेव गायकवाड, वैशाली नवनाथ वाघ आणि सुनिता बाळकृष्ण माने या सात सेवकांना देण्यात येणार असल्याचे प्रा. चौगुले यांनी सांगितले.
यापूर्वी हा पुरस्कार तानाजी मस्के, महावीर जोंधळे, डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर, डॉ. अनुराधा व डॉ. अच्युत गोडबोले सौ.निर्मला व संजय साळुंखे, विजय निंबाळकर, रघुनाथ ढोले, डॉ ज्ञानेश्वर मुळे यांना प्रदान करण्यात आला आहे. सदरबझारमधील हिरवाई प्रकल्पात गुरुवार दि. 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता या पुरस्कार वितरण सोहण होणार असून सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ. युवराज पवार, सुप्रसिद्ध कार्डिओलॉजीस्ट डॉ. सोमनाथ साबळे आणि अंनिसचे कार्यकर्ते, मानसोपचार तज्ञ डॉ. हमीद दाभोळकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
कोरोना काळात येथील सेवकवर्ग कोरोना बाधित मयत व्यक्तीच्या अनंताच्या प्रवासातील शेवटचा सोबती बनून आत्मीयतेने अंत्यसंस्कार करत आहेत. या त्यांच्या योगदानाबद्दल कैलास स्मशानभूमी टीमप्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून त्यांना हा पुरस्कार ज्या डॉक्टरांनी रात्रंदिवस अथक परिश्रम घेऊन कोविड रुग्णांची सेवा केली त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येत आहे. तसेच यावेळी आईवडीलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ बालाजी चॅरिटेबल ट्रस्टला पाच हजार रुपयांची देणगी देण्यात येणार असल्याचे प्रा. चौगुले यांनी सांगितले.