10 एप्रिलला पश्चिम बंगालच्या 44 जागांवर मतदान
कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालच्या पाच जिल्हय़ांमधील विधानसभेच्या 44 जागांसाठीच्या प्रचाराची गुरूवारी सांगता झाली आहे. या चौथ्या टप्प्यासाठी 10 एप्रिलला मतदान होणार आहे. या टप्प्यात 1,15,81,022 मतदार आहेत. त्यापैकी 58,82,514 पुरूष तर 56,98,218 महिला आहेत. हावडा, दक्षिण चोवीस परगाणा, हुगळी हे दक्षिण बंगालमधील जिल्हे, तसेच अलिपूरदुआर आणि कूचबिहार हे उत्तर बंगालमधील जिल्हे अशा पाच जिल्हय़ांमध्ये या 44 जागा आहेत.
मतदानाची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6.30 अशी आहे. एकंदर 15,940 मतदान केंद्रे असून प्रत्येक मतदानकेंद्रावर मोठय़ा प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. लोकांनी निर्भयपणे मतदान करावे, असे प्रशासनाचे आवाहन आहे.
महत्वाचे उमेदवार
राज्याचे शिक्षण मंत्री पार्था चॅटर्जी (बेहला पश्चिम), माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी (शिबपूर), केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो (टॉलीगंज), रत्ना चॅटर्जी (बेहला पूर्व) अशा अनेक प्रमुख उमेदवारांचे भवितव्य या टप्प्यात ठरणार आहे. तृणमूलमधून भाजपमध्ये आलेले राजीब बॅनर्जी दामजूरमधून तर भाजपच्या खासदार आणि अभिनेत्या लॉकेट चॅटर्जी चिनसुरा मतदारसंघांमधून आपले भवितव्य आजमावत आहेत. डाव्या आघाडीचे काही महत्वपूर्ण उमेदवार या टप्प्यात आहेत.
प्रचाराची परिसीमा या टप्प्यात भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँगेस यांच्या वतीने प्रचाराची राळ उडवून देण्यात आली होती. भाजपची धुरा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, चित्रपट अभिनेता मिथुन चक्रवर्ती आदी नेत्यांनी सांभाळली होती. तर तृणमूलच्या प्रचारासाठी ममता बॅनर्जी मैदानात होत्या. काँगेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी पश्चिम बंगालकडे पाठ फिरविल्याचे दिसले. यासाठी त्यांच्यावर बरीच टीकाही झाली.