सांघिक एअर रायफल, पिस्तूल व स्कीटमध्ये भारतीयांची चमक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताच्या युवा नेमबाजांनी आयएसएसएफ विश्व चषक नेमबाजी स्पर्धेत सनसनाटी कामगिरी पुढे चालू ठेवताना सोमवारी चौथ्या दिवशी 10 मी. एअर पिस्तूल व 10 मी. एअर रायफल मिश्र प्रकारात सुवर्णपदके मिळविली. याशिवाय पुरुषांच्या सांघिक स्कीट नेमबाजीतही भारताला सुवर्णपदक मिळाले. या प्रकारात महिलांना मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
सौरभ चौधरी व मनू भाकर यांनी 10 मी. एअर पिस्तूल मिश्र सांघिक नेमबाजीत सुवर्ण पटकावले. त्याआधी 10 मी. मिश्र एअर रायफल प्रकारात दिव्यांश सिंग पन्वर व इलावेनिल वलरिवन यांनी अप्रतिम कामगिरी करीत सुवर्ण मिळविले होते. 18 वर्षीय चौधरी व 19 वर्षीय मनू भाकर यांनी सुवर्णपदकाच्या लढतीत इराणच्या गोलनूश सेभातोलाही व जावेद फोरूघी यांच्यावर 16-12 अशा फरकाने मात केली. यातील दुसरी सिरीज झाल्यानंतर भारतीय जोडी 0-4 अशी पिछाडीवर पडली होती. ही पिछाडी भरून काढत त्यांनी भारताला पाचवे सुवर्ण मिळवून दिले. या जोडीने वर्ल्ड कप मिश्र सांघिक नेमबाजीत मिळविलेले हे पाचवे सुवर्णपदक आहे. इराणच्या जोडीने शानदार सुरुवात केली होती. पण भारतीय जोडीला लय सापडल्यानंतर त्यांना रोखणे अशक्य होऊन बसले. भारतीय जोडीने पहिले बक्षीस मिळवित सर्वांची अपेक्षापूर्तीही केली. भारतीय जोडीने आधी पिछाडी भरून काढत इराणची आघाडी 6-10 अशी कमी केली आणि नंतर 12-10 अशी आघाडीही मिळविली. ही आघाडी त्यांनी अखेरपर्यंत कायम राखत सुवर्ण मिळविले. दुसऱया पात्र फेरीत त्यांनी 384 गुण मिळविले होते.
नेमबाजीच्या याच प्रकारात यशस्विनी सिंग देसवाल व अभिषेक वर्मा यांनी कांस्यपदक मिळविले. त्यांनी तुर्कीच्या सेव्हल इलायदा तरहान व इस्माईल केलेस यांच्यावर 17-13 अशी मोठय़ा फरकाने मात केली. देसवाल व वर्मा यांनी प्रारंभापासून वर्चस्व राखत 8-0 अशी आघाडी घेतली. पण तुर्कीच्या खेळाडूंनी झुंजार प्रदर्शन करीत 10-8 अशी मुसंडी मारली. मात्र आघाडी कायम राखत भारतीय जोडीने कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केला.
इलावेनिल-दिव्यांश यांना सुवर्ण
त्याआधी सकाळच्या सत्रात 21 वर्षीय इलावेनिल व 18 वर्षीय दिव्यांश यांनी 10 मी. एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्ण मिळविले होते. वरिष्ठ स्तरावरील स्पर्धेत मिळविलेले इलावेनिलचे हे पहिलेच तर दिव्यांशचे वरिष्ठांच्या विश्व चषकमध्ये मिळविलेले चौथे पदक आहे. सुवर्णपदकाच्या लढतीत त्यांनी हंगेरीच्या जागतिक अग्रमानांकित इस्तवान पेनी व ईस्टर डेनेस यांच्यावर 16-10 अशी मात केली. पात्रतेच्या दुसऱया फेरीत भारतीय जोडीने 211.2 गुण घेत एकूण 421.3 तर पेनी-डेनेस जोडीने 419.2 गुण घेतले होते. अमेरिकेच्या मेरी कॅरोलीन टकर व लुकास कोझेनीस्की यांनी कांस्यपदक मिळविताना पोलंडच्या अनेटा स्टॅन्कीविझ व टोमास बार्टनिक यांच्यावर 17-15 अशा फरकाने मात केली. अंजुम मोदगिल व अर्जुन बबुटा यांना मात्र अंतिम फेरी गाठता आली नाही. पात्र फेरीत त्यांनी 418.1 गुण घेत पाचवे स्थान मिळविले.
पुरुष स्कीट संघालाही सुवर्ण
पुरुषांच्या सांघिक स्कीट प्रकारातही भारताला सुवर्ण मिळाले तर महिला विभागात रौप्यपदक मिळाले. गुरजोत खनगुरा, मैराज अहमद खान, अंगद वीर सिंग बजवा या भारतीय त्रिकुटाने कतारच्या नासेर अल अत्तिया, अली अहमद ए ओ अल-इशाक व रशिद हमद यांच्यावर 6-2 अशी मात केली. डॉ. कर्नी सिंग शूटिंग रेंजमधील शॉटगन रेंजवर ही स्पर्धा झाली. पात्र फेरीत भारताने 503, कतारने 507, कझाकने 501 गुण घेतले होते. महिलांच्या सांघिक स्कीटमध्ये परिनाझ धालिवाल, कार्तिक सिंग शक्तावत व गनेमत सेखाँ यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत त्यांना कझाकच्या रिनाटा नासीरोव्हा, ओल्गा पनारिना, झोया क्रॅवचेन्को यांच्याकडून 4-6 असा पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघाने पात्र फेरीत एकूण 341 गुण घेत कझाकला (327) मागे टाकले होते.